मुंबईMLA Anil Parab : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातून इन्कमिंग आणि आउटगोइंग सध्या जोरात सुरू आहे. लोकसभा उमेदवारीचे तिकीट मिळणार नाही. असं चिन्ह दिसल्यानंतर आयाराम-गयाराम यांचं प्रमाण वाढणार आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. यानंतर ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी ठाकरे गटाला जी गळती लागली आहे, ती काही थांबायचं नाव घेत नाही. नुकतंच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
ईडीची भीती दाखवण्या प्रयत्न : परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी शिवसेनेत अनेक पदं भूषवली आहेत. तसंच, त्यांचा चांगला जनसंपर्क असून, प्रशासकीय कामाचा अनुभव देखील दांडगा आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसंच, दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम अनधिकृत पद्धतीने केल्याचा आरोप भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमैया वारंवार करत आहेत. याप्रकरणी परबांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे. तसंच, हे प्रकरण अजून कोर्टाच्या अखत्यारीत आहे. दुसरीकडे तपास यंत्रणा आणि ईडीची भीती अनिल परब यांना दाखवली जात आहे. ईडीची भीती दाखवून अनिल परब यांना शिंदे गटात येण्यास भाग पाडलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच अनिल परब यांच्यावर ईडीचा दबाव असल्याचंही बोललं जात आहे.
काँग्रेस आमदार भाई जगतापही शिंदे गटाच्या वाटेवर -एकीकडे भाजपा आणि शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीमधील म्हणजे ठाकरे गट (शिवसेना), काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि नेत हे शिंदे गटात आणि भाजपामध्ये जात आहेत. नुकताच ठाकरे गटाचे (शिवसेना) आमदार रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस आमदार भाई जगताप देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. कारण भाई जगताप यांचा विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यात संपत आहे. काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी पुन्हा आमदारकीची संधी मिळेल की नाही याची खात्री नाही. म्हणून भाई जगताप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
आमदार रवींद्र वायकर शिंदेंसोबत : जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार आणि 13 खासदार गेले. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. कालांतराने हळूहळू आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर काही महिन्यांनी आमदार मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे आणि मिनाताई कांबळी या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर नुकतेच आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर जर आता आमदार अनिल परब यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असेल असं राजकीय जाणकार आणि तज्ज्ञांनी म्हटलं आहे.