मुंबईBJP On Electroal Bond :भाजपा देशातील सर्वांत मोठा पक्ष असून त्यांना ३० टक्के निधी भेटला असल्यानं त्यामध्ये काही वावगं नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलयं. तरीसुद्धा मरगळलेल्या काँग्रेससाठी हा तर फार मोठा मुद्दा आहे. अशा परिस्थितीमध्ये या मुद्द्याचा पुरेपूर फायदा उचलण्याच्या तयारीत विरोधक असून त्या पद्धतीनं त्यांनी विविध व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाला सर्वाधिक निधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करून हॅट्रिक साधण्यासाठी भाजपाने 'अबकी बार ४०० पार' आणि स्वतःच्या बळावर ३७० असं लक्ष ठेवलं आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक रोखे योजनेअंतर्गत राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीचा तपशील उघड केला आहे. या तपशीला प्रमाणे २०१८ मध्ये ही योजना सुरू केल्यापासून सत्ताधारी भाजपाला ६ हजार ९८६ कोटी ५० लाख रुपये इतका सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या सत्ताधारी पक्षाला १३९७ कोटी तर राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला १३३४ कोटी इतका निधी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून मिळाला आहे.
16 हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांची विक्री :तेलंगाणामध्ये १० वर्षे सत्तेत राहिलेल्या भारत राष्ट्र समितीला १३२२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकला ६५६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मार्च २०१८ ते मार्च २०२४ या संपूर्ण कालावधीत एकूण १६,५१८ कोटींच्या निवडणूक रोख्यांची विक्री झाली असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये सर्वांत जास्त निधी भाजपाला भेटला असल्या कारणाने आणि तो निधी ज्या कंपन्यांकडून आला आहे त्या संशयाच्या घेऱ्यात असल्यानं विरोधकांनी एकच हल्लाबोल केला आहे.