मुंबईLok Sabha Elections :लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच दुसरीकडं महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. "नाशिक, संभाजीनगर, दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागा महायुतीत विभागल्या गेल्या आहेत. या जागांवर महाआघाडीत चर्चा सुरू असून, या जागांवरचा कलह लवकरच मिटवून एक-दोन दिवसात जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल," असं शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भाजपाकडून कुरघोडी नाही :संभाजीनगरची जागा शिवसेनेची असतानाही सर्वेच्या नावाखाली भाजपा घेत आहे. त्यामुळं भाजप तुमच्यावर कुरघोडी करत आहे का? असा प्रश्न आमदार संजय शिरसाट यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, "महायुतीत कोणीही कुणावर कुरघोडी करत नाही. संभाजीनगरची जागा ही भाजपाचीच आहे. सर्वे काय सांगतो, सर्वेतून काय समोर आलं, याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. एक गाईडलाईनप्रमाणे महायुतीतील जागावाटप सुरु आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची काय भावना आहे, लोकांचा कल काय आहे, याला महत्व देऊन जागावाटप होत आहे. दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याची भावना आहे. सकारात्मक चर्चेतून आम्ही पुढं जात आहोत. प्रत्येक पक्षाला वाटत असतं की, आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचीसुद्धा अशीच भावना असते. पण शेवटी निर्णय वरिष्ठ पातळीवर नेते घेतात."
शिवसेनेला डावलले जातेय? :महायुतीमध्ये भाजपाकडून शिवसेनेला डावललं जातं आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यावर शिरसाट म्हणाले, "भाजपाकडून आम्हाला अशा प्रकारे कुठलीही वागणूक मिळत नाही. आमच्यामध्ये चांगला समन्वय आहे. भाजपा मागतोय म्हणून आम्ही देतोय, असा काही प्रकार नाही. किंवा भाजपा आमच्यावर कुरघोडी करतोय असाही प्रश्न नाही," असं शिरसाट म्हणाले. "ज्या ठिकाणी आमचा उमेदवार आहे, त्याला निवडून आणण्याची खऱ्या अर्थानं जबाबदारी ही भाजपाची आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर देखील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. कारण जर एकत्रपणे लढलो, तर आपल्या जास्तीत जास्त जागा येतील. त्यामुळं कुठे त्यांचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी असेल. आमचा उमेदवार जिथे असेल त्या ठिकाणी भाजपाची जबाबदारी असेल. त्यामुळं कुरघोडीचा प्रश्नच येत नाही," असं संजय शिरसाठ म्हणाले.
उद्धव ठाकरेंची नौटंकी सुरु :"अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कारवाईविरोधात आज दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची ही केवळ नौटंकी सुरु आहे. जेव्हा सुरेश जैन साडेचार वर्ष जेलमध्ये होते. त्यावेळी त्यांना तुम्ही एकदाही भेटायला गेलात? पक्षातील नेते अडचणीत होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात?," असा सवाल यावेळी शिरसाठ यांनी उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच "नाशिकची जागा शिवसेनेची आहे. तसंच हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे. महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय येत्या एक-दोन दिवसात होईल," असंही यावेळी संजय शिरसाट म्हणाले.