मुंबई-एकीकडे राज्यातील सत्तारुढ भाजपा महायुती सरकारच्या मंत्रिपदावरून अद्याप अनिश्चितता कायम असताना विरोधी पक्षातील काँग्रेसचा गटनेतादेखील जाहीर होऊ शकलेले नाहीत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने अद्याप त्यांचा गटनेता निश्चित केला नाही. गटनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसच्या कोणत्या आमदाराला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाही :महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भास्कर जाधव यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना आपापल्या पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्त केलंय. मात्र काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाही. मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करण्यास विलंब झाल्याने भाजपावर विरोधाचे आसूड ओढणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेसला गटनेता निवडीसाठी विलंब होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
काँग्रेसमध्ये गटनेतेपदासाठी चुरस :महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते मिळवण्यासाठी आवश्यक असलेली 29 ही आमदारांची संख्या गाठण्यात यश आलेले नाही. विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला मिळेल की नाही याबाबतदेखील अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेतेपदाची जबाबदारी तरी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये स्पर्धा लागलेली आहे.
नाना पटोले गटनेतेपदासाठी आग्रही :राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले नाना पटोले या पदासाठी आग्रही आहेत. तर विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले विजय वडेट्टीवारदेखील या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक आहेत. या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गटनेते पदावरून रस्सीखेच आणि चुरस असताना पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांची नावेदेखील चर्चेत आहेत. पक्षाला विधिमंडळात तरुण नेतृत्व मिळावे, अशी मागणी देखील पुढे येत आहे. कदम आणि देशमुख यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलंय. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी गटनेतेपदाचे नाव चर्चेमध्ये ठरवले जाईल आणि ते दिल्लीला पाठवले जाईल, त्यानंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. आठवडाभरात ही घोषणा होऊ शकते, असेही विजय वड्डेटीवार म्हणालेत.
गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच, अद्याप काँग्रेसचा गटनेता निश्चित नाही
काँग्रेसच्या गटनेत्याची निवड कधी होणार आणि त्यामध्ये कुणाची निवड होणार याकडे लक्ष लागले आहे. गटनेते पदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून, अद्याप काँग्रेसचा गटनेता निश्चित नाही.
नाना पटोले (Source- ETV Bharat)
Published : 5 hours ago