महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्ग तयार करणाऱ्या कंपनीकडून गौण खनिजांची चोरी; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना घ्यावा लागला पुढाकार

Subordinate Mineral Theft Case : चंद्रपुरातील राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून गौण खनिजांची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याबाबत गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Subordinate Mineral Theft Case
ट्रक जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 7:45 PM IST

Updated : Mar 9, 2024, 9:10 PM IST

चंद्रपूर Subordinate Mineral Theft Case : राजुरा ते गोविंदपूर या राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडून गौण खनिजांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आलाय. ही बाब जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या केलेल्या कारवाईत पाच हायवा ट्रक आणि एक पोकलेन जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी (8 मार्च) रात्री करण्यात आली. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील या कंपनीवर कारवाई झाली होती.

कंपनीकडून अहोरात्र गौण खनिजाचे उत्खनन : राजुरा ते महाराष्ट्राचे शेवटचे टोक गोविंदपूर या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 353B याचं काम सुरू आहे. या कामाचे कंत्राट जीआयएल या कंपनीला देण्यात आलं असून, त्याची किंमत ही 900 कोटींच्या घरात आहे. या बांधकामासाठी गौण खनिज उचल करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी सकाळ ते सायंकाळपर्यंत दिली आहे. यानंतर गौण खनिजाचे उत्खनन आणि त्याची वाहतूक केली जाऊ शकत नाही. असं असताना देखील या कंपनीकडून अहोरात्र गौण खनिजाचे उत्खनन केले जात होते. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आबीद अली यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत कारवाई करण्याचे आदेश संबंधित कोरपनाचे तहसीलदार व्हटकर आणि ठाणेदार एकाडे यांना दिलेत.

चोरीतील सामील वाहनं तहसील कार्यालयात जमा : प्रशासनाच्या आदेशानुसार महसुल आणि पोलिसांच्या पथकानं धाड टाकली असताना, कुसळ गावाच्या मार्गानं पाच हायवा ट्रक गौण खनिजाची चोरी करत असल्याचं आढळून आलं. त्यानुसार यु पी ७० जे टी ९०४५ , यूपी ७० जेटी ९०४६, एमएच २४ ए यू ५९३१, एमएच ३४ बीझेड ४८८०, एमएच २४ एव्हीं १९५० क्रमांकाचे पाच हायवा ट्रक येत असताना थांबविले. तसेच उत्खनन करणारी पोकलेन मशीन देखील जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा केली गेली असून त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार तहसीलदार यांना तपासणी करून योग्य कारवाईचे आदेश दिले होते, असं जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितलं.

यापूर्वी देखील झाली कारवाई : यापूर्वी देखील या कंपनीवर अशाच नियमबाह्य पद्धतीनं गौण खनिजांची वाहतूक करताना कारवाई झाली होती. आयएएस दर्जाचे पर्यवेक्षन अधिकारी यादव यांनी जानेवारी महिन्यात दोन वाहनांना जप्त केलं होतं. या कंपनीकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी शासन दरबारी आहेत. अशातच या कंपनीवर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा:

  1. शिंदे अन् अजित पवार गटाच्या बारा वाजण्याची कार्यकर्त्यांना भीती; एक आकडी जागा मिळण्याची शक्यता
  2. अंधश्रद्धेला 'मूठमाती' ! 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा
  3. देशभरात मानव वन्यप्राणी संघर्ष शिगेला; वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जातो 'इतक्या' नागरिकांचा बळी
Last Updated : Mar 9, 2024, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details