ठाणे - 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील हे पुन्हा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात असून, मनसे प्रमुख राज ठाकरे या मतदारसंघासाठी नेमकी काय रणनीती आखतात, याची सर्वाधिक उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत माघार घेणारे माजी आमदार सुभाष भोईर हे यावेळी मात्र शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झालेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे मैदानात उतरलेत. त्यामुळं चुरशीच्या ठरणाऱ्या या तिरंगी लढतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात.
राजू पाटलांनी शिंदेंचा प्रचार केला होता : लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना 3 लाख 80 हजार एवढं मतदान झाल्याने सध्या उद्धव ठाकरे गटाचा हुरूप वाढलेला दिसतोय. मात्र कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 लाख 51 हजार 702 मते मिळाली. तर वैशाली दरेकर यांना 65 हजार 407 मते मिळाली. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा आकडा पाहता महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान फारसे वाटत नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेचे राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणमधून मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील दुसऱ्यांदा निवडणुकीचं तिकीट दिलंय. 2019 मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव करत मनसेचे राजू पाटील हे निवडून आले होते. त्यावेळी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनसेचे नेते राजू पाटील यांनी रमेश म्हात्रे यांना पराभूत केलंय. मध्यंतरीच्या काळात मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचंदेखील पाहायला मिळालं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता.
मदतीच्या परतफेडीची मनसेला अपेक्षा : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच डॉ. शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 51 हजार 702 मते मिळाली. त्यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा होती. कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघावर आगरी मतदारांचे प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून या मतदारांच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी याच मतदारसंघाने दोनदा मनसेच्या बाजूने कौल दिलाय. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याकडे जिल्ह्यातील साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
...तर शिवसेनेत मतांची विभागणी : महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मतांमध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मागील विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईरांना उमेदवारीपासून दूर ठेवले होते. मात्र शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर भोईर उमेदवारीचे प्रमुख दावेदार झालेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.
दोन्ही पक्षांना विभागणीचा फटका : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे प्रमोद उर्फ राजू रतन पाटील 93 हजार 927 मते मिळवून विजयी झालेत. शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. म्हात्रे यांचा 7 हजार 154 मतांनी पराभव झाला. तत्पूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष गणू भोईर 84 हजार 110 मते मिळवून विजयी झाले. मनसेचे रमेश रतन पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. यात भोईर यांच्या विजयाचे अंतर 44 हजार 212 मतांचे होते. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत सुभाष भोईर हे 44 हजार 212 मतांच्या अंतराने निवडून आले असले तरीही यावेळी त्यांना शिवसेनेच्या विभागणीचा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येतेय. तथापि दोन्ही शिवसेनेच्या मत विभागणीचा लाभ मनसेला होऊ शकतो, अशीही शक्यता नाकारता येत नाही.
असा आहे मतदारसंघ : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 144 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कल्याण ग्रामीण मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्र. 6 आणि 7 आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 6 आणि 7, कल्याण तालुक्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वॉर्ड क्र. 31 ते 34, 51 ते 56, 66, 67 आणि 69 ते 77, कल्याण महसूल मंडळ (भाग) निळजे आणि हेदुटणे सझा यांचा समावेश होतो. कल्याण ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.
हेही वाचा -