मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी अनेक उमेदवारांनी दिग्गज नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढले. त्यातच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांनी देखील वाजतगाजत प्रचार रॅली काढली. यावेळी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना कुडाळकर यांनी 80 टक्के समाजकारण अन् 20 टक्के राजकारण हाच आपला ध्यास असल्याचं म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले मंगेश कुडाळकर? : "2019 साली मी आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हा प्रचारात ज्या-ज्या विकासकामांची मी आश्वासन दिली होती. त्याची मी पूर्तता केलेली आहे. विरोधक काहीही टीका करत आहेत. त्यांच्याकडं दुसरं कुठलं काम नसल्यामुळं ते टीका करत आहेत", असा टोला मंगेश कुडाळकर यांनी विरोधकांना लगावला. तसंच अजूनही मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार करेन," असंही कुडाळकर म्हणाले.
80 टक्के समाजकारण : पुढं ते म्हणाले की, "शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरताना चांगली कामं लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे, असं म्हणायचे. तसंच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण केलं पाहिजे, असंही बाळासाहेब सांगायचे. त्यामुळंच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हाच ध्यास घेऊन आम्ही जनतेची सेवा करतोय. महायुती सरकारनं अनेक लोक कल्याणकारी कामं केलीत. यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' क्रांतिकारी ठरत आहे. या योजनेचा फायदा निवडणुकीत नक्कीच दिसून येईल", असा विश्वास कुडाळकर यांनी व्यक्त केला.
सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध : "कुर्ला मतदारसंघातील कामगारांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, रेल्वे परिसरातील सामान्य लोकांचे प्रश्न, मिल कामगारांचे प्रश्न आदी सर्व प्रश्न मी मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलाय. माझं काम हे जनतेसमोर आहे. त्यामुळं कुर्ला मतदार संघातील जनता यावेळी माझ्यावर विश्वास टाकून मला कौल देईल. माझे सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध आहेत. इथं जरी तिरंगी लढत होत असली तरी जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करेन. तसंच जनतेनं पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी", असं आवाहनही मंगेश कुडाळकर यांनी मतदारांना केलं.
हेही वाचा -