मुंबई :Ambadas Danve : शिवसेना (उबाठा)पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना लोकसभेची उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच, ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतु, या सर्व चर्चांना अंबादास दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे. "मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून, पक्ष सोडण्याच्या बातम्या चुकीच्या आहेत," अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
रडणारा नाही तर लढणारा : "मी 30 वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे. मी रडणारा नाही तर लढणारा आहे. पदं येत असतात, पदं जात असतात. पक्ष नेत्यांपासून विरोधी पक्षापर्यंत जबाबदारी पार पाडणारा मी शिवसैनिक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठलाही आधार नसलेल्या फक्त सूत्रांच्या माहितीने माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्यांनी ज्यांनी माझ्या बाबत खोट्या बातम्या प्रसारित केल्या त्यांच्यावर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे.". अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी शिवसेना उबाठा पक्ष सोडण्याच्या चर्चेचा समाचार घेतला. तसंच, "जोपर्यंत उमेदवारी घोषित होत नव्हती तोपर्यंत मी नाराज होतो. एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर नाराजीचा प्रश्नच नाही. माझ्या नाराजीच्या बातम्या फक्त चॅनलकडूनच आल्या. कुठल्याही विरोधकांकडून आलेल्या नाहीत," असंही ते म्हणाले आहेत.
ठाकरे यांचे हात बळकट करणार : शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी आहे. स्वतंत्र बाणा आहे. मी आठ दिवसांमध्ये संपूर्ण जिल्हा प्रचारासाठी पिंजून काढणार आहे. आठवड्याभरामध्ये 90 गावांचा दौरा केला. पक्षाचा प्रचार करण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. चंद्रकांत खैरे आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. दरम्यान, महायुतीला संभाजीनगरमध्ये उमेदवार सापडत नाही. आपल्याला महायुतीकडून कुठलीही ऑफर आलेली नाही. आपण पक्षाचे शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आम्ही ताकतीने काम करणार आहोत. खैरे साहेब आमचे नेते आहेत. त्यांचं काम पक्षाने मला करायला सांगितलं आहे, ते आपण करणार. ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचंही म्हणाले आहेत.
अंबादास दानवे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच : अंबादास दानवे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. कारण शिवसेनेचा एक मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार आहे, अशा बातम्या प्रसारित केल्या गेल्या आहेत. या विषयावर बोलताना भाजपाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, "अंबादास दानवे भाजपापेक्षा वेगळे नाहीत. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचेच आहेत. त्यांचे आणि आमचे विचार वेगळे नाहीत. परंतु, त्यांच्याशी आमचा थेट संपर्क झाला नाही. आम्हाला संभाजीनगरची जागा मिळावी किंवा मित्र पक्षाला मिळाली तरी उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत."