नागपूर - राज्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारांची स्टंटबाजी वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात कर्णकर्कश आवाज करीत बाइक चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय. दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणे अथवा वेगवेगळे कर्णकर्कश आवाज करीत रस्त्यावरून धुमस्टाईल फिरणाऱ्या आणि बेलगाम झालेल्या तरुणाईला लगाम घालण्यसाठी आता नागपूर पोलीस पुढे सरसावलेत. पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी 440 मॉडीफाइड सायलेन्सरवर बुलडोझर चालवलाय. कारवाईसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेत.
मॉडीफाइड कर्कश आवाज काढणारे सायलेन्सर : श्रीमंत घरातील उद्धट तरुण आपल्या बुलेटसह अन्य अत्याधुनिक मोटारसायकलचे ओरिजिनल सायलेन्सर काढून त्याऐवजी मॉडीफाइड कर्कश आवाज काढणारे सायलेन्सर लावतात, त्यामुळे इतर प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास होतो. या मॉडीफाइड सायलेन्सरने बेफाम झालेले तरुण रस्त्यावर धूमस्टाईल बाइक चालवून मस्ती करतात. काही दिवसांपासून असे प्रकार वाढतच असल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. त्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या 440 मॉडीफाइड सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आलाय.
रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत कारवाई : नागपूर पोलिसांनी मॉडीफाइड सायलेन्सर नष्ट करत नागपूरच्या रस्त्यांवर प्रचंड ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बेलगाम बाइकस्वारांना धडा शिकवलाय. बुलेट आणि इतर बाइक्सवर मॉडिफाइड सायलेन्सर लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आणि अतितीव्र गतीने वाहन चालवणाऱ्या बाइकस्वारांच्याविरोधात नागपूर पोलिसांनी जोरदार कारवाई केलीय. नागपूर पोलिसांनी रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत गेल्या चार दिवसांत नागपूर शहरातील अनेक भागात दुचाकीला मॉडीफाइड सायलेन्सर असलेल्या बाईक विरोधात कारवाई करत 440 मॉडिफाइड सायलेन्सर्स जप्त केली होती. आज संविधान चौकात सर्व मोडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी रोडरोलर चालवत ते नष्ट केलेत.
फौजदारी कारवाईची तयारी : या संदर्भात मॉडीफाइड सायलेन्सर लावणाऱ्या बाईकर्स विरोधात ध्वनिप्रदूषण आणि तीव्र गतीने वाहन चालवण्यासंदर्भात चालान कारवाई तर करण्यात आलीच आहे. तसेच या तरुणांच्या विरोधात फौजदारी कारवाई करता येईल का याची कायदेशीर तपासणी करत असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिलीय.
हेही वाचा :