नांदेड Independence Day 2024 :भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. त्यानिमित्तानं नांदेड इथल्या खादी ग्रामोद्योग भवन इथं मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज बनवला जातो. हा राष्ट्रध्वज देशातील 16 राज्यात पाठवला जातो. त्यामुळं नांदेडमधील राष्ट्रध्वज निर्मितीला अनन्य साधारण महत्त्व आहे. "खादी हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. याच विचारातून खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातोय. नांदेडमध्ये खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज 16 राज्यांमध्ये जातो," अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी दिली.
महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड अशा दोन खादी ग्रामोद्योग मंडळांमध्ये राष्ट्रध्वज तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त खादीचा ध्वज राज्यात कुठंही तयार होत नाही. खादीच्या ध्वजांना असलेल्या मागणीनुसार उत्पादन कमी झालं नाही. खादी ग्रामोद्योग मंडळात निर्माण होणारा राष्ट्रध्वज जवळपास 12 राज्यात पाठवला जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो." - ईश्वरराव भोसीकर, अध्यक्ष, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती
तयार केले जातात विविध आकारातील राष्ट्रध्वज : खादी ग्रामोद्योग मंडळाकडून हुबळी (कर्नाटक), दिल्ली, मुंबई आणि नांदेड या ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते. या ठिकाणाहून तयार झालेले राष्ट्रध्वज देशाच्या विविध राज्यात पाठवले जातात. वरील चार ठिकाणी तयार झालेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवला जातो. नांदेडमध्ये विविध आकारातील राष्ट्रध्वज बनवले जातात. सर्वांत मोठा राष्ट्रध्वज 14 बाय 21 फूट आकाराचा असतो. अन्य ध्वज 8 बाय 21 फूट, 6 बाय 9 फूट, 4 बाय 9 फूट, 3 बाय साडेचार फूट, 2 बाय 3 फूट तसेच साडेसहा बाय 9 फूट आकाराचे राष्ट्रध्वज इथं बनवले जातात. मंत्रालयावर दररोज फडकणारा, मंत्र्यांच्या गाडीवर फडकणारा आणि राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी तसेच इतर शासकीय कार्यालयावर फडकणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योगमध्ये तयार केला जातो.
महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेडमध्ये बनतो राष्ट्रध्वज :नांदेड इथं ग्रामोद्योग केंद्रात राष्ट्रध्वज तयार करण्याचं काम जोमात सुरू आहे. याबाबत ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई आणि नांदेड अशा दोन खादी ग्रामोद्योग मंडळांमध्ये राष्ट्रध्वज तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त खादीचा ध्वज राज्यात कुठंही तयार होत नाही. खादीच्या ध्वजांना असलेल्या मागणीनुसार उत्पादन कमी झालं नाही. खादी ग्रामोद्योग मंडळात निर्माण होणारा राष्ट्रध्वज जवळपास 12 राज्यात पाठवला जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो."