महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील संप मागे, सरकार आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

12th Paper Examination strike : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य शासन शासकीय कर्मचाऱ्यांना जे आदेश लागू करेल, तेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना लागू होतील, असं शिक्षण मंत्रालयाकडून आज मान्य करण्यात आलं. त्यानंतर बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचं महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 4:11 PM IST

मुंबई 12th Paper Examination strike : कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बारावीची परीक्षा सुरू होताच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शनिवारपर्यंत तब्बल 50 लाख उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली होती. दरम्यान, शिक्षण मंत्र्यांनी आज रविवार (दि. 25 फेब्रुवारी)रोजी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. तसंच, अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत त्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचं महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी जाहीर केलं. दरम्यान, महासंघाच्या अध्यक्षांसह समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, सरचिटणीस प्रा. संतोष फासगे, उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत चर्चा केली. शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सहसचिव तुषार महाजन सहभागी होते.

जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाचं शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे आदेश निघतील तेच शिक्षकांनाही लागू होतील असं मान्य केलं आहे. त्यामुळे (दि.1 नोव्हेंबर 2005) पूर्वी जाहिरात देऊन त्यानंतर सेवेत रूजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच, (दि 1 नोव्हेंबर 2005)नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन अनुकूल असून त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार आहे. तसंच, वाढीव पदावरील प्रलंबित असलेल्या 253 शिक्षकांच्या त्रुटी पूर्तता केली असून, वित्त विभागाच्या सहमतीने लवकरच त्यांच्या समायोजनाचा आदेश काढला जाणार आहे.

शिक्षकांबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रस्ताव : आय. टी विषयाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याबाबतचा प्रश्न प्रलंबित होता, याबाबतीत या शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन मान्यताप्राप्त शिक्षकांचं 60 दिवसांत रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांची सुधारित सेवांतर्गत वेतनश्रेणी देण्याची योजना शिक्षकांना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसंच, 20/ 40 /60 टक्के अनुदान घेत असलेल्या संस्थांना पुढील टप्पा लवकरच लागू करू असंही मान्य केलं आहे.

बारावी परीक्षेतील भाषा विषयांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. सुमारे 50 लाखांहून अधिक उत्तर पत्रिका तपासणीचं कार्य सुरू झालं नव्हतं ते आता सुरू होईल. बारावीचा निकाल वेळेवर लावण्यास शिक्षण विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. -प्रा संतोष फाजगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

ABOUT THE AUTHOR

...view details