ठाणे : Tribal land In Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील 23 भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना 1978 साली शासनाने शेत जमिनीचे पट्टे नावे करून दिले होते. कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी नाममात्र पैसे देऊन धाक दाखवून ताब्यात घेतल्या होत्या. या जमिनींवर फार्म हाऊस बंगले बनवण्यात आले होते. चावडी वाचन कार्यक्रमादरम्यान ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या जमिनींचा शोध घेतला.
सर्व बांधकाम जमीनदोस्त : या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता त्यामध्ये बहुसंख्य आदिवासी कुटुंबांकडे जमिनी नसल्याने ते बेघर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी महसूल प्रशासन तहसीलदार कार्यालय भिवंडी यांच्याकडे पाठपुरावा करून या जमिनीचा शोध घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या आदिवासी कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी परत करण्यात आल्या. तसंच, सातबारा दप्तरी नोंद केल्याचे दाखले देण्यात आले. त्यानंतर तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन, पोलीस वनविभाग यांच्या मदतीने या अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील सर्व बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
23 पैकी 16 कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी मिळाल्या : भूमिहीन आदिवासी समाजाला शासनाने दिलेल्या जमिनी परस्पर बळकावणाऱ्यांची माहिती काढल्यानंतर या जमिनीवरील अतिक्रमण लक्षात आलं. त्याप्रकरणी शासनाने सर्व कागदपत्रं तपासून हे अतिक्रमण आज काढून टाकण्यास सुरवात केली आहे. या कारवाईमुळे यापुढे आदिवासी कुटुंबियांच्या जमिनी हडप करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर 23 पैकी 16 कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी आज परत मिळणार आहेत. ही कारवाई ऐतिहासिक कारवाई म्हणून ओळखली जाईल अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली आहे.
जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा : आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तात तहसीलदार यांनी उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. तालुक्यातील राहुर या गावात 23 भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना 1978 मध्ये तब्बल 80 एकर जमीन दिली होती. त्यावर कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी जमिनी हडप करून घरं बांधली होती. यावर कारवाई करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने जमिनी पुन्हा आदिवासी कुटुंबीयांच्या नावे करून जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.