महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात चार दशकांपासून आंदेकर टोळीचं वर्चस्व; टोळी प्रमुख ते राजकारणात एन्ट्री, कशी उदयास आली टोळी? - Pune Gang War History

Pune Gang War History : विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख राज्यासह देशभरात आहे. येथे विदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. नोकरी आणि राहण्यासाठी उत्तम आणि सुरक्षित शहर अशी पुण्याची ओळख. मात्र, हीच ओळख आता गुन्हेगारी, गँगवॉर, कोयता गँग, ड्रग पेडलरचं शहर म्हणून झाली. पुण्यात गँगवॉर कधीपासून (Andekar Gang Vs Malvadkar Gang) सुरू झालं? त्याचा इतिहास काय आहे? वाचा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट....

Pune Gang War History
वनराज आंदेकर (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 6:46 PM IST

पुणे Pune Gang War History : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर 1 सप्टेंबरला रात्री दहा ते बारा तरुणांनी पिस्तूल आणि कोयत्यानं हल्ला करत त्यांची (Andekar Gang Vs Malvadkar Gang) हत्या केली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली. हा हल्ला कोणी केला? का केला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असताना, प्रथमदर्शी या हल्ल्यामागं वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण आणि मेव्हणा असल्याचं समोर आलं. असं असलं तरी वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर शहरात पुन्हा एकदा आंदेकर टोळीची चर्चा सुरू झाली.

गँगवॉरची कहाणी : मागील चार दशकांपासून पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या नाना पेठेत आंदेकर टोळीची दहशत आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील मध्यवस्ती भागात अनेक छोट्या- मोठ्या टोळ्या होत्या. याच टोळीमध्ये बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर यांचीही टोळी होती. मटका, जुगार, देशी दारू विकणे आणि त्यातून पैसे कमवणे हा या टोळीचा मुख्य धंदा होता. तिथेच नाना पेठ परिसरात माळवदकर यांची देखील एक टोळी होती. आंदेकर आणि माळवदकर यांची एकच असलेली टोळी कालांतरानं काही वादामुळं वेगळी झाली. त्यामुळं प्रमोद माळवदकर यांनी वेगळी टोळी निर्माण केली. 1980 साली आंदेकर आणि माळवदकर या टोळीत वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली.

आंदेकर गँग विरुद्ध माळवदकर गँग :काही काळानं प्रमोद माळवदकर यांच्या वडिलांची हत्या आंदेकर टोळीनं केली. याचाच बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीनं 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर यांची देखील हत्या केली. तेव्हापासून पुण्यातील टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू झालं. हे गँगवॉर जवळजवळ 10 वर्ष चाललं आणि यात 6 ते 8 गुंडांची हत्या एकमेकांकडून करण्यात आली.

आंदेकर टोळीची राजकारणात एन्ट्री : पुण्याच्या मध्यवस्तीत हे गँगवॉर सुरू असताना, 1997 साली पुणे पोलिसांनी प्रमोद माळवदकर यांचा एन्काऊंडर केला. त्यानंतर माळवदकर टोळी नामशेष झाली. नाना पेठ परिसरात मात्र आंदेकर टोळी ही वेगानं वाढू लागली होती. या टोळीची सूत्र सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनी सांभाळली. सुरुवातीला ही टोळी फक्त गुन्हेगारीशी निगडित होती. नंतर या टोळीनं राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत या टोळीचे अनेक सदस्य निवडून आले. हा प्रवास असाच पुढे जात गेला. त्यानंतर 1998-99 मध्ये आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर देखील झाल्या. तरी देखील आंदेकर टोळीची दहशत ही वाढतच होती.

वनराज आंदेकर यांचा 'टोळी प्रमुख ते नगरसेवक' प्रवास : एका हत्या प्रकरणात या टोळीचे प्रमुख सूर्यकांत आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यानंतर उदय झाला तो वनराज आंदेकर यांचा. त्यानंतर वनराज आंदेकर हे या टोळीचे प्रमुख झाले. प्रमुख झाल्यानंतर वनराज यांनी टोळीचा प्रवास पुढे नेण्यास सुरुवात केली. यात त्यांची साथ भाऊ कृष्णा आंदेकर देखील देवू लागले. यानंतर वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील 1992 मध्ये नगरसेवक झाले. वनराज आंदेकर यांची आई राजश्री आंदेकर यादेखील 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका झाल्या. एवढंच नव्हे तर वनराज आंदेकर यांनी देखील 2017 साली निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले.

अनेक टोळ्या संपवणाऱ्या टोळीत कौटुंबिक वाद :बंडू आंदेकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना शहरात अनेक टोळ्या उदयास आल्या. पण, जेव्हा बंडू आंदेकर हे शिक्षा भोगून बाहेर आले तेव्हा पुन्हा एकदा आंदेकर टोळीचे वर्चस्व वाढू लागले. हत्या, हत्येचा प्रयत्न, सुपारी, खंडणी, वसुली अशा गुन्ह्यांमध्ये पुन्हा वाढ झाली. त्यामुळं इतर टोळींबरोबर या आंदेकर टोळीचा संघर्ष देखील सुरूच राहिला. बंडू आंदेकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. या टोळीनं अनेक टोळ्या संपवल्या, पण आता वनराज आंदेकर यांचीच हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातूनच वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा

  1. पुण्यात पुन्हा गँगवॉर; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, 3 जणांची चौकशी सुरू - Vanraj Andekar Firing
  2. विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाचाच वरचष्मा? मुख्यमंत्रीपदावरही दावा - Assembly elections
  3. "फडणवीस यांना इतिहास समजलेला नाही, ते औरंगजेब फॅन क्लबचे..."- संजय राऊतांची खोचक टीका - Surat loot remark

ABOUT THE AUTHOR

...view details