ठाणे Badlapur Girls Sexual Assault Case : बदलापूर इथल्या एका विद्यालयात दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे याला अटक केल्यानंतर त्याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मागील दीड महिन्यापासून फरार असलेला शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांचा पोलीस शोध घेत होते. अखेर ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना बेड्या ठोकण्यात ठाणे क्राईम ब्रँचला यश आलं आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना एसआयटी पथकाकडं वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे.
शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे होता फरार :बदलापूर अल्पवयीन चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेनं अक्षय शिंदे याला अटक केली. मात्र शाळेचा ट्रस्टी तुषार आपटे आणि संस्थेचा सचिव उदय कोतवाल हे दोघं मागील दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर या प्रकरणात गुन्ह्यातील फरार आरोपींकडं पोलिसांनी मोर्चा वळवला. अखेर ठाणे गुन्हे शाखेनं तुषार आपटे आणि कोतवाल यांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटी टीमकडं सोपवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील अधिक माहिती ही फरार असलेल्या आरोपींना माहिती असल्याची शक्यता आहे. या दोघांच्या अटकेनं आता या वादग्रस्त प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरं समोर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
बदलापूर अत्याचार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अक्षय शिंदेसह शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल, तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका गुन्ह्यामध्ये तुषार आपटे, उदय कोतवाल यांना कल्याण न्यायालयानं जामीन मंजूर केला असून, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून, शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर करणार आहेत. - आरोपीचे वकील चंद्रकांत सोनवणे