ठाणे Thane Corporation On Banner :महानगरपालिका क्षेत्रामध्ये तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार ठाणे शहरातील 204 जागा निश्चित केल्या गेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊनच हे पोस्टर आणि बॅनर लावता येतील. ऑनलाईन परवानगी मिळाल्यानंतरच सदर जागेवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर आणि बॅनर लावण्याची मुभा दिली जाणार आहे. या धोरणामुळं ठाणे महापालिका प्रशासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न येणार आहे.
शहरातील 204 जागांवर लावता येईल बॅनर :ठाणे महापालिका क्षेत्रातील मोक्याच्या ठिकाणी अनेक अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. महापालिकेच्या अधिकृत जागेवर असलेले पोस्टर्स अनधिकृतरित्या लावलेले आपण नेहमीच पाहतो. परंतु या पोस्टर्स आणि बॅनरमधून कोणतंच उत्पन्न मात्र महापालिकेला मिळत नसल्यानं मोठा आर्थिक फटका ठाणे महापालिका प्रशासनाला बसतो. त्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं एक धोरण आखलं आहे. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यासाठी तब्बल 204 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन पद्धतीनं दिली जाईल परवानगी :ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी एक पोर्टल तयार करण्यात आलं आहे. जाहिरातींचे बॅनर, पोस्टर लावण्यासाठी एक 'क्यू आर' कोड उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती उपायुक्त (जाहिरात) महेश सागर यांनी दिली. सदरची योजना ही एक खिडकी योजना आहे. त्यामुळे परवानगी घेण्यासाठी कुठंही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनं ही परवानगी दिली जाईल, असं महेश सागर यांनी सांगितलं.