ठाणे: नाशिक मुंबई महामार्गावरून मुंबईकडं भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्चडीस कारने दुचाकीस्वाराला धडक देऊन पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत २१ वर्षीय दर्शन शशीधर हेगडेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मर्चडीस कार चालकाच्या विरोधात 'हिट अँड रन'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नौपाडा पोलिस फरारी वाहन चालकाचा शोध घेत आहे.
काय आहे घटना : मृतक दर्शन शशीधर हेगडे हा नितीन जंक्शन येथे सोमवारी पहाटे १-५० वाजण्याच्या सुमारास दुचाकी टीव्हीएस ज्युपिटरवर बसला होता. यावेळी थार आणि मर्चडीस कारन भरधाव वेगाने मुंबईकडं निघाली होती. दोन्ही कार नितीन कंपनी जंक्शन जवळ आल्यानंतर दुचाकीवरील दर्शन हेगडेच्या दुचाकीला धडक दिली. यात दर्शन गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित घटनास्थळावरील रिक्षा चालक मनीष यादव यांनी रिक्षातून ठाण्याच्या कौशल्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं. परंतु त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. तर ठाण्यातील या प्रकरणामुळं परिसरात एकाच खळबळ उडाली.