आरोपीला कशाप्रकारे अटक करण्यात आली याविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी ठाणे : अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनंच प्रियकराच्या मदतीनं हत्या केली. त्यासाठी बायकोनं दिल्लीच्या गुंडाना सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील एका ढाब्या मोर घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंड अशा चौघांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये तीन आरोपी दिल्लीत राहणारे आहेत. सुपारी घेऊन हत्या करणारा एक आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मुलानं नोंदविली वडिलांच्या हत्येची तक्रार:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रमेश झा (वय ४८) हे मूळचे दिल्लीचे आहेत. ते अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करीत होते. ते अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वेदयनगर परिसरात आरोपी बायको सुमनदेवी आणि दोन मुलांसह राहत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास त्यांची अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर भररस्त्यात दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूनं भोसकून हत्या केली. याची तक्रार २६ फेब्रुवारी रोजी मृताच्या २४ वर्षीय मुलानं अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिली.
आरोपींना दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक:गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता, घटनास्थळावरून दोन इसम पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता, दोन्ही मारेकरी रिक्षात बसून जाताना दिसले. त्यातच पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी दिल्लीला पळून गेलेत. पोलिसांनी तातडीनं दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता, हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला.
नवऱ्याच्याच हत्येची दिली सुपारी:पोलिसांनी अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, मृतक रमेश झा यांचा २५ वर्षांपूर्वी आरोपी बायकोशी विवाह होऊन दोन मुलं आहेत. त्यातच गेली दहा वर्षांपासून आरोपी बायको मुलांसह दिल्लीत राहत होती. तिनं धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंधातून अनैतिक संबध प्रस्थापित केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर २०२२ साली आरोपी बायको दिल्लीतील प्रियकराला सोडून अंबरनाथ शहरात नवऱ्याकडे राहण्यास आली. मात्र मृतक नवरा अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याचं आरोपी बायकोनं तिच्या प्रियकराला सांगितलं. त्यामुळे दोघांनी नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचून दिल्लीतील दोन गुंडांना हत्येची सुपारी दिली. त्यानुसार मृतक नवऱ्यावर मारेकऱ्यांनी दोन ते तीन दिवस पाळत ठेवली होती. विशेष म्हणजे, दिल्लीतून आलेले तिन्ही आरोपी अंबरनाथ शहरातील एका लॉजवर मुक्कामाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
तिघांना पोलीस कोठडी:आरोपी बायकोसह तिचा प्रियकर धर्मवीर गुप्ता यानं दिल्लीतील अटक दोन गुंडांना हत्येची सुपारी दिली. काही रोख रक्कम तसेच जमिनीचं आमिष दिलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना कळाली. आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि एक सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या इतर एक आरोपी अशा तिन्ही आरोपींना ५ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एक आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक असल्यानं त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- पत्रकारांनी सरकारला धरलं धारेवर; प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी
- नेटफ्लिक्सवरील इंद्राणी मुखर्जीच्या स्टोरीला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, सीबीआयची फेटाळली याचिका
- 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता, टाडा न्यायालयाचा निकाल