ठाणेMotorman Cabin Reel Shoot : दोन तरुणांनी मोटरमनच्या केबिनमध्ये घुसून रील बनवली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांचा माग काढत त्यांना अटक केली. ही घटना मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात चार नंबर फलाटावर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घडली. ही रील इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर रील स्टारला रेल्वे जवानांनी नाशिकमधून अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (२०), रितेश हिरालाल जाधव (१८) अशी अटकेतील रीलस्टार आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत.
असं केलं शूट : रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा दिवसापूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये रील बनवण्यात आली. आरोपींनी मोबाईल कॅमेऱ्यात रीलचा व्हिडीओ शूट केला. या रिलच्या व्हिडीओमध्ये ते मोटरमन असल्यासारखे तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. शिवाय लोकल सुरू करण्याचा फाजील अभिनय करून मित्रांना मागील डब्ब्यातमध्ये बसण्याचं सांगत होते. तसंच "तुम्हारा भाई अब ट्रेन चलायेगा," असं तो म्हणत होता. तर, दुसरा व्हिडिओमध्ये म्हणाले,"तुला दुचाकी चालविता येत नाही. तुला लोक काय चालविता येईल?" त्यानंतर तो मित्राच्या गालात चापट मारतो. यानंतर रील स्टारनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.