महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे हादरलं! डोक्यात दगड घालून ओला चालकाची हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू - OLA DRIVER MURDER

ओला चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Thane Crime OLA Driver Murder in Bhiwandi, case has been registered against unknown accused
भिवंडीत ओला चालकाची हत्या (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2025, 10:03 AM IST

ठाणे : ओला चालकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भिवंडी तालुक्यातील पाइपलाईनलगतच्या झाडाझुडपात ओला चालकाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्रम इकबाल कुरेशी (वय 22, रा. जोगेश्वरी, मुंबई) असं हत्या झालेल्या ओला चालक तरुणाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अक्रम कुरेशी हा मुंबई शहरातील जोगेश्वरी भागात आपल्या कुटुंबासह राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्याचा रहिवाशी होता. अक्रम हा नेहमीप्रमाणे 17 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास ओला कार घेऊन घराबाहेर पडला. दुपारपर्यंत तो कुटुंबाच्या संपर्क होता. मात्र, दुपारनंतर त्याचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर जीपीएसच्या मदतीनं अक्रमचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचं शेवटचं लोकेशन भांडुप परिसरात दिसून आलं. परंतु, त्यानंतर त्याचं लोकेशन दिसत नसल्यानं मध्यरात्री ओशीवारा पोलीस ठाण्यात अक्रम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलीस शोध घेत असताना अक्रमचा मृतदेह दगडानं ठेचलेल्या अवस्थेत तानसा-वैतरणा पाइपलाईनलगतच्या झाडाझुडपात आढळून आल्याची माहिती मिळाली.

आरोपींचा शोध सुरू : घटनेची माहिती मिळताच 18 जानेवारी रोजी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह अक्रमचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोगाव येथील पाइपलाईन रस्त्यावर उभ्या असलेल्या ओला कार आणि मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर अक्रमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. अक्रमचा भाऊ खुशिद आलम इकबालुद्दीन कुरेशी (वय 28) यांच्या तक्रारीवरुन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर भिवंडी तालुका पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एडके यांनी दिली.

हेही वाचा -

  1. मांजरीच्या पिल्लाला जमिनीवर आपटून हत्या करणाऱ्या 'मांजरे'वर गुन्हा दाखल; काय आहे नेमकी भानगड?
  2. सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! ५०० रुपयांच्या वादातून सख्ख्या लहान भावाचा केला खून, आरोपी भाऊ गजाआड
  3. धक्कादायक! आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोन्ही पाय तोडले

ABOUT THE AUTHOR

...view details