महाराष्ट्र

maharashtra

भिवंडीत कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांसह खाद्यपदार्थांची विक्री; दोघांवर गुन्हा दाखल - Bhiwandi Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 10:37 PM IST

Updated : Sep 3, 2024, 10:52 PM IST

Thane Crime News : कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंची तसंच कालबाह्य खाद्यपदार्थांची साठवणूक करून त्यावर नव्यानं स्टिकर चिटकवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Thane Crime News Sale of expired food items along with expired cosmetics in Bhiwandi, case has been registered against two
भिवंडीत कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांसह खाद्यपदार्थांची विक्री (ETV Bharat Reporter)

ठाणे Thane Crime News : भिवंडी तालुक्यातील ओवळी गावाजवळील एका गोदामात कालबाह्य सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू आणि कालबाह्य खाद्यपदार्थ बेकायदेशीररित्या विक्री केली जात असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सदरील गोदामावर छापा टाकून तेथून सव्वा कोटींचा कालबाह्य मुद्देमाल जप्त करत मॅनेजरसह कामगाराच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मॅनेजर जतीन राजेश शर्मा (25 रा. बदलापूर, पश्चिम) आणि सुरेश कल्पनाथ विश्वकर्मा (52 रा. भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.

डीसीपी श्रीकांत परोपकारी (ETV Bharat Reporter)
नेमकं काय आहे प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमधील सांताक्रुझ येथील राजू अग्रवाल यांच्या मालकीची सावरिया फ्यूचर वर्क्स प्रा. लि. नावानं भिवंडी तालुक्यातील ओवळी गावाच्या हद्दीत सागर कॉम्प्लेक्समध्ये कंपनी आहे. सदर कंपनीत आरोपी जतीन आणि सुरेश काम करतात. या कंपनीत साबण, बाथरूम क्लिनर, शेविंग क्रीम यांसारखी 15 कालबाह्य सौंदर्य वर्धकं आणि जाम, बुस्ट पावडर यांसारखी विविध कालबाह्य खाद्यपदार्थ जतीन सुरेशच्या मदतीनं बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुषंगानं पोलिसांनी 2 सप्टेंबर रोजी ओवळी येथील एफ गाळा नं. 16, 17, 18 मध्ये छापा टाकला. त्यावेळी तब्बल 1 कोटी 25 लाख 86 हजार 26 रुपये किंमतीचा कालबाह्य मुद्देमाल आढळून आला.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जतीन आणि सुरेश कालबाह्य सौंदर्य प्रसाधनं आणि कालबाह्य खाद्यपदार्थांच्या मालाची विल्हेवाट न लावता सदर मालावरुन कालबाह्य झालेल्या तारखेचे स्टिकर काढून त्यावर नवीन मुदतवाढ असलेले स्टिकर चिटकवून विक्री करत असल्याचं आढळून आलं. अशा कृत्यामूळं नागरिकांच्या जीवितास अपाय होईल याची जाणीव असतानाही कालबाह्य मालाची विक्री करून ग्राहकांची मागील चार महिन्यांपासून फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी आरोपी जतीन आणि सुरेशच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार रिजवान असगर सैय्यद यांच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहिता 318 (4) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चोपडे करत आहेत.

हेही वाचा -

  1. Bhiwandi News : कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Last Updated : Sep 3, 2024, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details