मिरा भाईंदर Thane Crime News : मिरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. मिरारोडच्या नयानगर आणि बेवर्ली पार्क परिसरात पाच बांगलादेशी महिला बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या. या महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीय.
गुन्हा दाखल :मिरारोडच्या नयानगर आणि बेवर्ली पार्क परिसरात काही झोपडपट्टीचा भाग आहे. येथे काही बांगलादेशी नागरिक पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता नया नगर भागात तीन तर बेवर्ली पार्क परिसरात दोन अशा पाच महिला आढळल्या. त्यांची चौकशी केली असता त्या मूळच्या बांगलादेशी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच त्या भारतात आल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात तीन आणि मिरारोड पोलीस ठाण्यात दोन जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष या टीमनं केली आहे.