ठाणे : कल्याण आणि डोंबिवली शहराला ‘उडता पंजाब’ करणाऱ्या 27 नशेच्या सौदागरांना कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकानं बेड्या ठोकल्या आहेत. नुकतीच पथकानं डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागात कारवाई करून चार तस्करांना अटक केलीय. त्यांच्याकडून लाखोंचं चरस, गांजा आणि एमडी पावडर जप्त करण्यात आली. या विशेष पथकानं जानेवारी महिन्यात 23 तस्करांना अटक केली असून 6 फेब्रुवारी रोजी एका दिवसात आणखी 4 तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलीय.
...अन् तस्कर जाळ्यात अडकले : अतुल झेंडे यांनी सांगितलं की, डोंबिवलीतील राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण आणि त्यांचे पथक रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळ, अंमली पदार्थ विक्रीसाठी तस्कर येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सनिल श्रीनाथ यादव, (वय-25, रा. आनंद बंगलो डोंबिवली पूर्व) याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याची झडती घेतली असता 8.48 ग्रॅम वजनाचं 16,500 रूपये किंमतीचं एमडी ड्रग्स आढळून आलं. या तस्करावर मानपाडा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम 8 (क), 21 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दुसऱ्या घटनेत बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये राहणाऱ्या शंकर महादेव गिरी (वय 46) या तस्कराला कल्याण पश्चिममधील दुर्गाडी किल्ल्याजवळ सापळा रचून ताब्यात घेतलं. या तस्कराकडून 9 किलो 950 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तर तिसऱ्या घटनेत डोंबिवली पश्चिम भागातील राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिराच्या बाजूला मोकळ्या मैदानात सचिन एकनाथ कावळे (वय 32) अमन विदं गुप्ता उर्फ पप्पु (रा. दत्तनगर, डोंबिवली पूर्व) या दोघा तस्करांच्या जोडीलाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 23.53 ग्रॅम वजनाचं एमडी आणि 10 ग्रॅम वजनाचं चरस असा एकूण 93,943 रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.