ठाणे : जन्मदात्या आईनं पोटच्या चिमुकल्याची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना शहापूर तालुक्यातील वासिंदजवळील कासणे गावात घडली. घरगुती भांडणातून जन्मदात्या आईनंच पोटच्या मुलाला ठार मारल्यानं आई विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सासू, सुनेच्या भांडणात अवघ्या 1 वर्षीय बालकाला जीव गमवावा लागल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हत्या करणाऱ्या त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.
सासू सुनेच्या भांडणात चिमुकल्याचा गेला बळी :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासणे गावात संदेश भोई (वय 31) यांचं कुटूंब राहते. संदेश यांचा विवाह 2022 रोजी आरोपी महिलेसोबत झाला. संदेश हा जवळच्याच गोडाऊन इंडस्ट्रीत रात्रपाळीत सुरक्षारक्षकाचं काम करतो. आरोपी आणि संदेश या दाम्पत्याला वर्षभरापूर्वी मुलगा झाला. परंतु त्याला जन्मतःच आजार असल्यानं त्याच्यावर मुंबईतील वाडीया रुग्णालयात उपचार सुरु होते. आजारी मुलगा जन्माला घातला यावरुन आरोपी सून आणि तिची सासू यांच्यात नेहमीच खटके उडत होते.
सासू चिमुकल्याला घेऊन नणंदेकडं गेल्यानं पेटला वाद :आरोपीची सासू मंगळवारी चिमुकल्याला घेऊन टिटवाळा इथं मुलीकडं गेली. तेथील हवामान आजारी चिमुकल्याला काही मानवलं नाही. बदललेल्या हवामानामुळे त्याला ताप आला. म्हणून सासू त्याला घेऊन पुन्हा मंगळवारी रात्री घरी कासणे गावी आल्या. मात्र चिमुकल्याची प्रकृती बिघडल्यावरुन सून आणि सासूमध्ये रात्री जोरदार भांडण झालं. हे भांडण मिटवून संदेश कामावर गेला. त्यानंतर बुधवारी पहाटे रात्रपाळीवरुन संदेश घरी आला, मुलासोबत खेळता खेळता गाढ झोपला. त्यानंतर चिमुकल्याच्या आईनं सर्वांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारास घराच्या पहिल्या माळ्यावरील टाकीत बुडवून त्याची हत्या केली.
चिमुकला हरवल्याचा केला बहाणा :दरम्यान नंतर मृत मुलाचे वडील संदेश यांनी आपला बाबू दिसत नसल्याचं सांगत सर्वच कुटूंबासह मित्रांनी त्याचा शोध घेतला. तर दुसरीकडं चिमुकला हरवल्याचा कांगावा आरोपी आईनं केला. मात्र पती संदेशला पत्नीवर ती कांगावा करून खोटं बोलत असल्याचा संशय आला. तिच्याकडं पती संदेशनं अधिक चौकशी केली असता, तिनं मुलाला मारल्याचं सांगितलं. त्यानंतर "संदेश भोई यांच्या तक्रारीवरून पडघा पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेऊन अटक केली. चिमुकल्याच्या मृतदेहावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. या गुन्ह्याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे," अशी माहिती पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली. गुरुवारी आरोपी आईला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचंही कुंभार यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- भाजपा आमदाराच्या मामाची हत्या; गुन्हे शाखेनं दोन संशयितांना ठोकल्या बेड्या, खुनाचा होणार उलगडा ?
- केज तालुक्यातील माजी सरपंचाची अपहरण करुन हत्या; 6 पैकी दोघांना अटक
- पुणे शहरात 48 तासात 5 खून; अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश वाढला, नागरिकांमध्ये दहशत