महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नशेची सौदागर 'शबाना' ला फिल्मी स्टाईलनं ठोकल्या बेड्या; 20 लाखांहून अधिक किमतीचे चरस जप्त - Thane Smuggler Woman Arrested - THANE SMUGGLER WOMAN ARRESTED

Thane drugs Seized : ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्या एका तस्करी महिलेला अटक केली. पोलिसांनी या महिलेकडून लाखो रुपयांचा चरस जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

Thane drugs Seized
Thane drugs Seized (Source - ETV BHARAT)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 11:53 AM IST

Updated : Jul 24, 2024, 12:11 PM IST

ठाणे : अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाईच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या अंमली पदार्थाच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या नशेच्या सौदागरांसह ड्रग्स माफियांना शोधून त्यांना बेड्या ठोकण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार भिवंडीतील शांतीनगर पोलीस पथकानं एका 39 वर्षीय नशेची सौदागर असलेल्या लेडी डॉनला फिल्मी स्टाईलनं सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. शबाना अन्वर कुरेशी असं अटक केलेल्या लेडी डॉनचं नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई :या प्रकरणाची माहिती देताना ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, "भिवंडीच्या शांतीनगर पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना अमली पदार्थाच्या विक्रीचा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी ही बाब गांभीर्यानं घेत त्या गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करण्याचं नियोजन केलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली सर्जेराव पाटील यांच्यासह पथकानं भिवंडीतील अशोकनगर येथील पोस्ट ऑफिस समोर सापळा रचला. घटनास्थळी चरस विक्रीसाठी आलेल्या शबानाला ताब्यात घेतलं."

फिल्मी स्टाईलनं अटक : दुचाकीवरून शबाना ही चरस विक्रीसाठी येताच पोलीस पथकानं फिल्मी स्टाईलनं रचलेल्या सापळ्यात ती सापडली. तिला ताब्यात घेऊन तिच्या दुचाकीची झाडाझडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीमधून 2 किलो 2 ग्राम वजनाचा चरस जप्त करण्यात आला. याची किंमत 20 लाख 75 हजार रुपये असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह शबानाला ताब्यात घेतलं. पोलीस हवालदार संतोष पवार (47) यांच्या तक्रारीवरून 22 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता 2024च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून शबानाला अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे पोलिसांच्या अटकेत असलेल्या शबानाच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातही अर्धा किलो चरस (अंमली पदार्थाच्या) पुड्या आढळून आल्या. चरस पुड्या विक्रीसाठी वापरत असलेला एक इलेक्ट्रॅनिक वजन काटाही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

शबानानं दिली कबुली : शबाना ही मूळची उत्तर प्रदेशची राहणारी आहे. तिनं चरस उत्तर प्रदेशमधून भिवंडीत विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. शबानावर यापूर्वी एकही नशेचा धंदा करत असल्याचा गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तिच्यावर संशय येत नव्हता. मात्र, ती राहत असलेल्या भिवंडी शहरातील कसाईवाडा - निजामपूरा भागात नशेची सौदेबाजी करत असल्याचं तपासात समोर आलं. 22 जुलै रोजी शबानाला न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. शबाना हा चरस कोणाला देण्यासाठी त्या ठिकाणी आली होती? यापूर्वीही किती चरसची विक्री केली? तिला चरस कुठून मिळायचा? याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहेत.

हेही वाचा

  1. बनावट पासपोर्टवर केला पाकिस्तानचा दौरा; महिलेला ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Woman Booked For Visit Pakistan
  2. पैशाच्या वादातून तरुणाचं अपहरण: मुंबई पोलिसांनी 12 तासात पीडिताची पुण्यातून केली सुखरुप सुटका - Mumbai Police Rescue Kidnapped Man
Last Updated : Jul 24, 2024, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details