मुंबई Vinayak Raut Defeat:मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांनी केवळ 48 मतांनी पराभव केलाय. कोकणात रत्नागिरी मतदारसंघात विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी पराभव केलाय. हे दोन्ही पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागले आहेत. आता या दोन्ही उमेदवारांसाठी ठाकरे गटानं निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर निर्णय आल्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असं ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी सांगितलं. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विनायक राऊत यांच्या मतदारसंघात काय घडलं, हे मी ऐकलं. 'त्या' संदर्भातही आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशारा यापूर्वीच दिला आहे.
कोकणात पराभव :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे यांना 4लाख 48 हजार 514 मते मिळाली असून विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली आहेत. नारायण राणें यांचा 47 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. 2014 तसंच 2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत विजयी झाले होते. त्यामुळं ते येथून पुन्हा हॅट्ट्रिक करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडं त्यांना रोखण्यासाठी भाजपानं नारायण राणेंना मैदानात उतरवलं होतं. 2009 मध्ये नारायण राणे यांचे मोठे चिंरजीवर निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनाचे संयुक्त उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता.