महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू पुन्हा सहपरिवार एकत्र - RAJ AND UDDHAV THACKERAY TOGETHE

राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं, अशी शिवसैनिक अन् मनसैनिकांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू सहपरिवार एकत्र आलेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray together
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 2:28 PM IST

Updated : Dec 22, 2024, 7:09 PM IST

मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईतील दादर येथील राजे शिवाजी विद्यालयात राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह राज ठाकरे यांच्या मनसेलाही मोठा फटका बसला होता. यानंतर राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं, अशी अनेक शिवसैनिक अन् मनसैनिकांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू सहपरिवार एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलंय.

कौटुंबिक सोहळ्याला गुण्यागोविंदानं हजर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचं आज दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नकार्य संपन्न झालं. याप्रसंगी दोन्ही ठाकरे बंधूंनी शेजारी-शेजारी उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यादरम्यान दोन्ही कडील ठाकरे कुटुंब उपस्थित होते. दोन्ही कुटुंबीय अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात वावरताना दिसलं. वास्तविक राजकारणात हे दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असताना कौटुंबिक कार्यक्रमात मात्र हे गुण्या-गोविंदाने एकत्र आलेले आज पाहायला मिळाले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र (व्हिडिओ सौ. - संमारंभातील प्रत्यक्षदर्शीच्या कॅमेऱ्यातून)

यापूर्वीही आले एकत्र? :यापूर्वी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळालेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे सुपुत्र शौनक पाटणकर यांचा विवाह सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला राज ठाकरे यांनीही हजेरी लावली, यावेळी रश्मी ठाकरेंनी स्वतः राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं, परंतु उद्धव आणि राज यांची प्रत्यक्ष भेट थोडक्यात हुकली होती.

अमित ठाकरेंचा पराभव जिव्हारी : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं, यासाठी दोघांचेही समर्थक देव पाण्यात ठेवून आहेत. अशा परिस्थितीत राजकीयदृष्ट्या या दोघांची युती अद्यापही दृष्टिपथात नसली तरीसुद्धा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने हे दोघं एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी दोन्ही बाजूने जोर धरत आहे. विधानसभेत माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेंना रिंगणात उतरवलं होतं. अमित विरुद्ध उद्धव काका म्हणजेच उद्धव ठाकरे हे उमेदवार देणार नाहीत, अशी अपेक्षा असताना त्यांनी महेश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि विजयी केलं. हा पराभव राज ठाकरे यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या जिव्हारी लागलाय. इतकेच नाही तर राज ठाकरे यांच्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. या कारणाने हे दोघे बंधू आता एकत्र येतील का? हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त 18 जपानी साईभक्त महिला शिर्डीत; दर्शनानंतर काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ - Japanese In Shirdi
  2. धनंजय मुंडे साई चरणी लीन; 'या' विषयावर दिली प्रतिक्रिया - Dhananjay Munde
Last Updated : Dec 22, 2024, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details