ठाणेBJP ShivSena Differences: लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे थेट मुख्यमंत्र्यांना कल्याण लोकसभा निवडणुकीवरून इशारा देत आहेत. दुसरीकडे भाजपाला ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून सतत डावलले जात असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे शहरातील महिलांना टीएमटीमध्ये 50 टक्क्यांनी सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळावा, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ठाणे स्थानकात या सेवेचा शुभारंभ करताना संजय केळकर यांना मात्र आमंत्रणही पाठविण्यात आलेलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
सहनशीलतेला देखील एक मर्यादा असते :भाजपाला नेहमी शिवसेनेने डावलले आहे. मोदीजी यांचे नाव घ्यायचे आणि भाजपा पक्षाला कमी लेखायचे याबाबत भाजपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. यामुळे भविष्यात जुने ताणलेले संबंध लगेच सुधारणार नाही हे संजय केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. ठाण्यातील भाजपा हतबल नाही आणि असा अपमान आता सहनही करणार नाही, असा इशारा देत केळकरांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच अंगावर घेतल्याचे पाहायला मिळाले.