गडचिरोली Pregnant Woman Rescue Gadchiroli : जिल्ह्यात पावसाने कहर (Gadchiroli Heavy Rains) केला असून नदी-नाल्यांना पूर आला. अशातच भामरागड तालुक्यातील कुचेर येथील शीला सडमेक या नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी सोमवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. पावसामुळं इरपनार या गावाजवळील वाहणाऱ्या नाल्याला पूर आला होता. त्यामुळं महिलेला रुग्णालयात दाखल करणं कठीण झालं होतं. मात्र, तहसीलदारांनी बचाव पथकाच्या मदतीनं महिलेला रेस्क्यू करत रुग्णालयात दाखल केलं.
नाल्याच्या पुरातून महिलेला केलं रेस्क्यू : शीला सडमेक ही भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कुचेर येथील रहिवासी आहे. प्रसुती वेदना होत असताना ती मोटरसायकलनं रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. मात्र, गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही, त्यातच इरपणार गावाजवळ असलेला नाला तुडुंब वाहत असल्यानं रुग्णालयात पोहोचणं शक्य झालं नाही. दरम्यान, याबाबतची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्यानंतर तहसीलदार किशोर बागडे यांनी ही माहिती नायब तहसीलदार यांना दिली. नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार स्वतः: रिस्क बोट आणि दोन बचाव पथकं घेऊन नाल्यावर पोहचले. त्यानंतर लगेच गरोदर महिलेला रेस्क्यू करून तिला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र : गडचिरोली हा अतिदुर्गम भाग आहे. त्यामुळं येथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. यापूर्वी देखील भामरागड तालुक्यातील एका महिलेला जेसीबीच्या बकेटद्वारे नाला पार करावा लागला होता. तर कोरची तालुक्यात खाटेची कावड करून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आलं.
गडचिरोलीत पूर सदृश्य स्थिती : मागील काही दिवसांपासून पावसानं कहर केला असून, याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्याला बसला. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.