नाशिकBhujbal Farm Drone Reki : राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्मवर शुक्रवारी 5 एप्रिल रोजी रात्री सव्वासात ते साडेसात वाजेच्या सुमारास ड्रोन कॅमेरा फिरल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने या भागाची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून भुजबळ फार्मवर बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दिली भेट :मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ फार्म येथील सुरक्षा अधिकारी दीपक मस्के यांनी अंबड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक येथील निवासस्थान असलेले भुजबळ फार्म येथे शुक्रवारी रात्री सव्वासात ते साडेसात वाजेच्या दरम्यान ड्रोन कॅमेरा फिरताना दिसला. या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहय्याने भुजबळ फार्मची रेकी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणा नंतर तातडीनं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन माहिती घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना चौकशीचे आदेश दिले. तसंच तक्रार अर्जानंतर भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.