सातारा -शेळी पालनासाठी कर्ज लवकर मंजूर होत नसल्याच्या रागातून तरुणाने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कराड शाखेतील मॅनेजरवर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आशिष कश्यप (मूळ रा. बिहार) हे गंभीर जखमी झाले आहेत. कराड शहर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. आशितोष दिलीप सातपुते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड), असं त्याचं नाव आहे.
अर्जदाराने केली नव्हती कागदपत्रांची पूर्तता -आशिष कश्यप हे जुलै 2024 पासून इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कराड शाखेत असिस्टंट बँक मॅनेजर म्हणून काम पाहात आहेत. ऑगस्ट महिन्यात उज्वला दिलीप सातपुते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांनी शेळी पालनासाठी ऑनलाईन कर्जप्रकरण केलं होतं. कर्ज प्रकरणामध्ये कागदपत्रे अपूर्ण होती. स्पॉट व्हिजिटला गेल्यानंतर मॅनेजरने अर्जदारास पूर्तता करण्यास सांगितलं होतं. बुधवारी अर्जदार महिला बँकेत आली होती. त्यावेळी कागदत्रे मिळाल्यानंतर तुमचं कर्ज मंजुर करण्यात येईल, असंही मॅनेजरने अर्जदारास सांगितलं होतं.
थेट कोयत्यानं वार - अर्जदार महिला कालच बँकेत येऊन गेल्या असताना दुसऱ्याच दिवशी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अर्जदार उज्ज्वला सातपुतेंचा मुलगा आशितोष हा मॅनेजरच्या काऊंटरवर आला. शेळीपालन कर्जाच्या संदर्भात विचारू लागला. मॅनेजर त्यास माहिती देत असतानाच संशयताने शिवीगाळ सुरू केली. शर्टातून लपवून आणलेला कोयता काढून 'तू आम्हाला कर्ज देत नाही. मी तुला जिवंत ठेवत नाही, म्हणत डोक्यात वार केला. दुसरा वार मॅनेजरच्या हातावर लागला. त्या हल्ल्यात मॅनेजर गंभीरित्या जखमी झाले. जीवाच्या भीतीनं त्यांनी रेकॉर्ड रूममध्ये जाऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर संशयित बँकेतून निघून गेला.
आरोपीला अटक - या हल्ल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलिसांना देताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी जखमी मॅनेजरला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मॅनेजरच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी संशयित आरोपी दिलीप सातपुते यास ताब्यात घेतलं. संशयिताकडून कोयता जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम शादीवान करत आहेत.