बीड : "मी त्यांना गुपचुप भेटायला गेलो नव्हतो. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलावलं होतं. त्यामुळं मी तिथं गेलो. तिथं अचानक धनंजय मुंडे आले. ते इथं येणार आहेत, हे मला माहिती नव्हतं. यावेळी आमच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली", असं भाजपा आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीबद्दलच्या बातम्या आल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलं.
दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या :"अंजलीताई काय म्हणतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. त्यांनी आमच्या भेटीवरती वक्तव्य करत दोन गोष्टी एकत्र केल्या. बावनकुळेंच्या उपस्थितीत झालेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना घरी भेटायला गेलो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला असं वाटतं की, याबाबतीत कोणं तरं कारस्थान रचतयं. हे काम कोण करतय हे मला माहिती आहे. या प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती देईन आणि जे कट रचतायत त्यांचा योग्यवेळी पर्दाफाश करेन. याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे." अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.
धनंजय मुंडेंनी भेट घ्यायला पाहिजे होती : माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांचं आभार मानतो. संतोष देशमुख प्रकरणामध्ये जरी धनंजय मुंडेंनी माणुसकी सोडली असली तरी, त्यांनी देशमुख कुटुंबाला भेटायला यायला पाहिजे होतं. पंकजा मुंडेही भेटायला आल्या नाहीत. पण आम्ही माणुसकी सोडली नाही. माणुसकी म्हणून भेटायला गेलो.
15 ते 20 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेची भेट झाली :सुरेश धस म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, त्यांच्याकडून काही सांगण्यात चूक झाली असेल. परंतु, त्यांनी आम्हाला हे मिटतंय का? अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं. मी क्लिअरकट त्यावेळीच सांगितलं होतं. त्यावेळी ते मनभेद नाहीत, मतभेद आहेत, असं म्हणाले. आमच्यामध्ये मतभेद आहेत. या प्रकरणाच्या बाबतीत मी माघार घेणार नाही. हे मी त्या बैठकीत स्पष्ट सांगितलं."