पुणे Supriya Sule PC :राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असून सगेसोयरे बाबतचा आणि कुणबी नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी ओबीसी समाजाच्यावतीनं उपोषण केलं जात होतं. आज सरकारचं शिष्टमंडळ या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना भेटलं. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, राज्यात मराठा आणि ओबीसी असा जो वाद सुरू आहे त्याला सरकार जबाबदार आहे. हे सरकार जुमलेबाजांचं सरकार असून मराठा आणि ओबीसी समाजाला फसवत आहे, अशी टीका यावेळी सुळे यांनी केली.
उशिरा का होईना, सरकारला जाग आली :पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. आज सरकारच्या शिष्टमंडळानं आंदोलन ठिकाणी भेट दिली. याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, उशिरा का होईना; पण सरकारला जाग आली आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त यांच्या आरक्षणाच्या बाबत दहा वर्षांच्या पूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ हे बारामतीत येऊन सांगितलं होतं. गेल्या दहा वर्षांपासून गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता असून आता कमी का होईना, पण पुन्हा एकदा सत्तेत आलो आहोत. आरक्षणाबाबत सरकारनं प्रस्ताव मांडावा. आम्ही पूर्ण ताकदीनं त्याला पाठिंबा देऊ असं यावेळी सुळे म्हणाल्या.