पुणे- बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर आज पहाटे 4:50 वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या," ही घटना खूपच धक्कादायक आहे. त्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात. मुले शाळेत जात असतात. अनेक लोक रस्त्यावर असतात. असे असताना जर भररस्त्यात गोळीबार होत असेल तर "अब की बार गोळीबार सरकारवर" शिक्कामोर्तब झालं आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, " काही महिन्यांपूर्वी सत्तेत असलेल्या आमदारांकडून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्यात आला. याचा अर्थ असा की ट्रील इंजिन सरकारकडून अशा गोळीबाराला कोणाचं तरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना, अशी टीका यावेळी खासदार सुळे यांनी केली. राज्याची काय परिस्थिती चालली आहे? हे सगळे बघत आहेत. हे सगळं गृहमंत्री यांचं अपयश आहे."
शेवटी पोटातील ओठांवर येतं- खासदार सुळे म्हणाल्या, " ज्या भारताच्या सुपुत्रानं आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाच रक्षण आमच्याकडून नेहेमी केलं जाणार आहे."सरकारच धोरण बदलत चाललं आहे का, असं यावेळी खासदार सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की," संविधान बदलायचं आहे, असे भाजपाचे खासदारच म्हणाले होते. शेवटी पोटातील ओठांवर येतं."