मुंबई - अभिनेता सुनील शेट्टी नुकताच मुंबईत 'हंटर' या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. "शूटदरम्यान त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. मात्र, डॉक्टरांनी सेटवर येऊन त्याला औषधं दिली, थोड्या विश्रांतीनंतर त्यानं शूटिंग पुन्हा सुरू केलं. ती किरकोळ दुखापत होती.", असं त्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.
सुनिल शेट्टीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून या बातमीला दुजोरा दिला आहे. "किरकोळ दुखापत, काहीही गंभीर नाही! मी पूर्णपणे बरा आहे आणि पुढील शॉटसाठी तयार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि करत असलेल्या काळजीबद्दल आभारी आहे.." असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलंय. सुनिल जखमी झाला असल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानं त्याच्याबद्दल काळजी सुरू झाली. अनेकांनी त्याच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. परंतु चाहते आणि सहकारी आपल्याबद्दल काळजी करत आहेत हे लक्षात आल्यानंतर आपण बरे असल्याचा खुलासा त्यानं केला आहे. त्याचे निवेदन वाचून मात्र चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
'हंटर: टूटेगा नहीं तोडेगा' हा चित्रपट प्रिन्स धीमान आणि आलोक बत्रा यांनी दिग्दर्शित तयार केला आहे आणि या चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केली आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाच्या पहिल्या सीझनमध्ये A.C.P विक्रम सिन्हा या प्रमुख भूमिकेत सुनिल शेट्टी काम करत आहे. ईशा देओल, राहुल देव, बरखा बिश्त, मिहिर आहुजा, टीना सिंग, चाहत तेजवानी, करणवीर शर्मा, सिद्धार्थ खेर, गार्गी सावंत आणि पवन चोप्रा यांच्या या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. .
'हंटर: टूटेगा नहीं तोडेगा' ही 8 भागांची एपिसोडिक मालिका यॉडली फिल्म आणि सारेगामा इंडिया लिमिटेडचा चित्रपट विभागनं याची निर्मित केली आहे. आणि प्रिन्स धीमान आणि आलोक बत्रा दिग्दर्शित ही एक थरारक मालिका असेल.
सुनील शेट्टीच्या आगामी प्रोजेक्टचा विचार करता त्याच्या हातामध्ये 'द लीजेंड ऑफ सोमनाथ', 'वेलकम टू द जंगल', 'लायन्सगेट'सह 'नंदा देवी' शो आणि 'हंटर 3' असे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत.