पुणे Supriya Sule On Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या निमित्तानं मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. "दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ते दिल्लीला भाजपाच्या मोठ्या नेत्यांना भेटले. त्यावेळेस त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती. त्यांची मतं कोणाच्या पारड्यात पडतील, हे काळच ठरवेल. मी त्यांचं भाषण काल ऐकलं नाही, प्रचारात होते," असं यावेळी सुप्रिया सुळे पुण्यात बोलताना सांगितलं.
पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या भाषणावर कारवाई करावी :यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. याबाबत सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान मोदीजी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केलं आहे. त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी कारवाई करावी. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गेल्या वेळेस पंतप्रधान मोदी यांच्या समोर एक गलिच्छ वाक्य बोलणं झालं, हे थांबलं पाहिजे. त्याचा मी निषेध करते, माझी अपेक्षा आहे, पंतप्रधान मोदी यांचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे. अशी भाषा थांबली पाहिजे, अशा व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे," असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात दुष्काळी परिस्थिती :राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "जवळपास डिसेंबरपासून सातत्यानं दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहे. मजूर अडचणीत आहे, हे सातत्यानं मी बोलत आहे. माझ्या मतदारसंघात उजनीत एक थेंब पाणी नाही, नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 35 टक्के पाणी शिल्लक आहे. राज्यात पाणी पुरेल की नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. हे ट्रिपल इंजिन खोके सरकार अतिशय असंवेदनशील आहे. प्रचारात व्यस्त आहे, त्यांना दुष्काळाचं काही घेणंदेणं नाही," अशी टीका यावेळी सुळे यांनी केली.