मुंबई Mumbai Railway Mega Block :रेल्वेनं देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी 4 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत रुळांची दुरुस्ती, सिग्नल प्रणाली आणि इतर यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेनं मेन लाईनवर मुलुंड ते माटुंगा आणि हार्बर लाईनवर वडाळा ते मानखुर्द दरम्यान मेगाब्लॉक घेतल्याचं जाहीर केलं आहे.
11 ते 4 वाजेपर्यंत असणार ब्लॉक :माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते 4 या वेळेत मेगाब्लॉक असेल. यावेळी प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी गाड्यांच्या वेळेची माहिती घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
असा असणार ब्लॉक :याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईत दररोज साधारण 40 लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेनं प्रवास करतात. ज्याला आपण मुंबईची लोकल ट्रेन असं म्हणतो. या उपनगरी रेल्वे सेवेत अनेकदा पॉईंट फे, सिग्नल यंत्रणेत बिघाड तर कधी रुळांना तडे जाणे यामुळे अडथळे येतात. गाड्या उशिरा धावल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसतो. हे टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवसात रेल्वे प्रशासन या सर्व तांत्रिक गोष्टींच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामं करतं. तांत्रिक कामासाठी रविवारी तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. या अंतर्गत मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वडाळा रोड - मानखुर्द अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सोबतच पश्चिम रेल्वेने वसई रोड ते भाईंदर दरम्यान अप - डाऊन जलद मार्गावर रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे
- मार्ग कोणता : मेन लाईन - मुलुंड ते माटुंगा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
- कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत
परिणाम - या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचेल. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुढे पुन्हा मूळ धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.