नागपूर :मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे प्रचंड नाराज आहेत, अशा बातम्या कालपासून माध्यमांवर सुरू आहेत. यावर आज स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासा केलेला आहे. ते म्हणालेत "मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून व्यथित होण्याचं काही कारण नाही. मी कधीही व्यथित होत नाही. जे पद पक्ष मला देतो त्या पदासाठी मी काम करतो," मात्र असं जरी असलं, तरी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिर्घ चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
माझ्या देहबोली वर जाऊ नका :"एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं. मात्र काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत माझं नाव असताना ऐनवेळी नाव कमी करण्यात आलं, त्याची मला माहिती नाही. जर मुख्यमंत्री असं म्हणत असतील की पक्षानं माझा वेगळा विचार केलाय, तर ते सांगतील ते खरं असेल," असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. "माझ्या देहबोली वर जाऊ नका, मी सर्वाना हसत हसत उत्तरं देत आहे. त्यामुळे मी व्यस्थित नाही," असं देखील ते म्हणाले.
मी नाराज नाही, व्यथितही नाही: सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती, मात्र देहबोली वेगळीच (Reporter) नितीन गडकरीची घेतली भेट : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. सुधीर मुनगंटीवार मात्र, आजच्या कामकाजात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्यांना हवा मिळाली. ते नागपुरात असताना विधिमंडळाकडं आले नाहीत. मात्र, त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. "मोठ्या भावाला भेटण्यासाठी गेलो होतो. तिथं आमच्यात काय चर्चा झाली हे सांगायचं नसते," असं देखील ते म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं होतं श्रद्धा आणि सबुरी हेच नितीन गडकरी यांनी सांगितलं असं सांगत त्यांनी आपली नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचं लपवण्याचा प्रयत्न केला.
पक्ष संकुचित विचार करत नाही :सुधीर मुनगंटीवारांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या ब्रिजभूषण पाझारे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी सुधीर मुनगंटीवार हे आग्रही होते. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. पुढे ब्रिजभूषण पाझारे यांनी अपक्ष म्हणून चंद्रपूर येथून निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज झाले असल्यानं त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागल्याची चर्चा रंगली आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की "मी निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी मागितल्याचा राग पक्ष असा संकुचित विचार करून काढत नाही."
हेही वाचा :
- “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
- चंद्रपूर जिल्ह्यात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ ? सुधीर मुनगंटीवार की बंटी भांगडिया, राजकीय चर्चेला उधाण
- "देवा, तू या लोकांना अक्कल देण्यात कंजुषी का केली?"; सुधीर मुनगंटीवारांचा 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत संतप्त सवाल - Sudhir Mungantiwar