महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तपोवनात आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षण संस्कार; पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या भूमीत मेळघाटातील 'किलबिल; - Amravati Tapowan News - AMRAVATI TAPOWAN NEWS

Students Got Shelter and Education : डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी वसवलेल्या तपोवनात मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांवर गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण संस्कार केले जात आहेत. तसंच इथं विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवण्याचीही सोय करण्यात आली आहे.

students from melghat got shelter and ecadmic environment at tapovan resident ashram
तपोवनात आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षण संस्कार (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 8:04 AM IST

अमरावती Students Got Shelter and Ecadmic Environment : कुष्ठरोग निर्मूलन यासह कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी समाजसेवक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ते डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी 1946 ला अमरावतीत आनंददायी वातावरण असणाऱ्या 'विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन' या निवासी आश्रमाची स्थापना केली. या तपोवनात आता मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षण संस्कार केले जात आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी वसवलेल्या या तपोभूमीत मेळघाटातील चिमुकल्यांची किलबिल गत दोन वर्षांपासून ऐकायला मिळत आहे. तपोवनातील या नव्या उपक्रमासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

समाजानं नाकारल्यांना आधार : समाजानं नाकारलेल्यांना आधार देण्याचा प्रयत्न पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजी पटवर्धन यांनी तपोवन संस्थेच्या माध्यमातून केला. दाजी पटवर्धन यांचा आदर्श पुढं ठेवून मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासोबतच त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, या उद्देशानं संस्थेत असणाऱ्या महामाना मालवीय विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत एकूण 50 आदिवासी मुलांना शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. केवळ शिक्षणाचीच सुविधा नव्हे तर या मुलांना या ठिकाणी निवासाची आणि भोजनाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही निशुल्क सेवा आहे. यासाठीचा लागणारा खर्च संस्था आणि सेवाभावी व्यक्तींच्या मदतीनं केला जातो, अशी माहिती विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

अमरावतीतील तपोवनात आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षण संस्कार (ETV Bharat Reporter)

विद्यार्थ्यांसाठी अशी आहे सुविधा : तपोवनातील 'तारका' या सभागृहात 'विद्यार्थी शैक्षणिक संगोपन प्रकल्प' या नावानं खास निवारा सुसज्ज करण्यात आलाय. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र पलंग, गादी, चादर, ब्लॅंकेट, उशी अशी व्यवस्था पुरवण्यात आलीय. या सभागृहातच मोकळ्या ठिकाणी भव्य अशी अभ्यासिका निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी शैक्षणिक पुस्तकांसह सामाजिक, राजकीय आणि सामान्य ज्ञान या संदर्भातील पुस्तकांची व्यवस्थादेखील आहे. प्रत्येकाला छान टेबलवर बसून स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल, याची दक्षता या अभ्यासिकेत घेण्यात आलीय. विशेष म्हणजे दिवसभर शाळेत शिकवणारे शिक्षक सायंकाळी साडेसात वाजता या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन आणि त्यांना योग्य सूचना देऊनच घरी जातात. या ठिकाणी विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी तपोवन संस्थेतील तीन ते चार कर्मचारी सदैव उपलब्ध आहेत. तसंच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांचं आरोग्य आणि इतर संपूर्ण गरजा संस्थेच्या वतीनं पूर्ण केल्या जातात.

विद्यार्थ्यांची अशी आहे दिनचर्या : पहाटे सहा वाजता उठणे, सात वाजता नाष्टा आणि त्यानंतर दहा वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करतात. दहा वाजता तपोवनच्या आवारात असणाऱ्या खानावळीत रांगेत जाऊन विद्यार्थी जेवण करतात. यानंतर बारा ते पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची शाळा भरते. शाळा सुटल्यावर सहा वाजेपर्यंत विद्यार्थी त्यांच्या निवारा परिसरातील भव्य पटांगणात विविध खेळ खेळतात. सायंकाळी सहा वाजता रात्रीचं जेवण होतं. त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यासिकेत बसून अभ्यास करतात.

जेवणाची उत्तम व्यवस्था : गेल्या अनेक वर्षांपासून तपोवन येथील भोजनगृहात तपोवनात राहणारे कुष्ठरोगी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. तपोवनातील कुष्ठरोग्यांची संख्या आता बोटांवर मोजण्या इतकी आहे. तपोवनात कायमस्वरूपी राहणारे निराधार आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं भोजनालय आहे. या ठिकाणी पोळ्या बनवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना वरण-भात, भाजी पोळी यासह शुक्रवारी आणि रविवारी अंडीदेखील दिली जातात. इयत्ता नववी आणि दहावीतील मोठी मुलं पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जेवण वाढतात. नित्यनेमानं प्रार्थना करूनच विद्यार्थी भोजन करतात.

संस्थेची आर्थिक बाजू : विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन या संस्थेला शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. या संस्थेत हातमागावर विणलेल्या चादरी, सतरंजी यासोबतच सागवान लाकडांपासून तयार केलं जाणारं उत्तम दर्जाचं फर्निचर अशा साहित्याची विक्री केली जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच संस्थेला अनेक देणगीदारांची मदत मिळते. संस्थेनं आपलं शेत मक्तेदारीनं वाहण्यासाठी दिलं आहे. त्यातून संस्थेला थोडेफार पैसे मिळतात. एकूण संस्थेची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी संस्थेत असणाऱ्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दरवळावा, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत, असं प्राचार्य डॉ. सुभाष गवई म्हणालेत.

हेही वाचा -

  1. मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार - Amravati News
  2. चिमुकल्यांनी राख्या तयार करून बाजारात आणल्या विकायला; पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम - Raksha Bandhan 2024

ABOUT THE AUTHOR

...view details