मुंबई-राज्यातील गावखेड्यात जाणारी एसटी हे तिथल्या प्रवाशांच्या वाहतुकीचं प्रमुख साधन असतं. गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळानंही प्रवाशांसाठी चांगले निर्णय घेतलेत, त्यामुळे एसटीलाही अच्छे दिन आलेत. दरवर्षी दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याच निमित्तानं एसटी महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येत असते. यंदाही एसटी महामंडळाची ही भाडेवाढ प्रस्तावित होती. परंतु याबाबतचा निर्णय महायुती सरकारने रद्द करीत राज्यातील मतदार प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय.
एसटी प्रवाशांना दिलासा :राज्य सरकारच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने यंदा दिवाळीदरम्यान एसटी प्रवाशांना दिलासा देण्यात आलाय. दरवर्षी दिवाळीदरम्यान एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात येते. हंगामी भाडेवाढ केल्यानंतरही एसटीच्या उत्पन्नात घट न होता वाढ होत असल्याचं आतापर्यंत दिसून आलंय. गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ केली होती. 15 दिवसांमध्ये एसटी महामंडळाला 328 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते, त्यापैकी भाऊबिजेच्या एकाच दिवशी 31 कोटी 60 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले होते.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ रद्द : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीत निवडणुकांची आणि प्रचारांची धामधूम सुरू असणार आहे. या दरम्यान राज्यातील एसटी प्रवाशांना दिलासा देता यावा, यासाठी राज्य सरकारच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा दिवाळीदरम्यान करण्यात येणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
केव्हा होणार होती भाडेवाढ? : राज्य सरकारने 11 ऑक्टोबर रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार राज्यात 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीतील गर्दीचा हंगाम लक्षात घेता परिवर्तनशील भाडेवाढ करण्याबाबत सूचना सर्व एसटी आगारांना देण्यात आल्या होत्या. मात्र आता ही भाडेवाढ रद्द करण्याचे नवे परिपत्रक एसटी महामंडळाने जारी केले असून, परिपत्रकानुसार सध्य असलेल्या प्रति टप्पादराप्रमाणेच भाडे आकारणी करण्यात यावी, अशा सूचना एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी दिल्यात.
हेही वाचा -
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत तोडगा, वाचा 'किती' दिली पगारवाढ - ST employees called off strike
- एसटी कर्मचारी संपामुळे १५ कोटींचे नुकसान, मुख्यमंत्री आज काढणार तोडगा - ST Bus strike second day