महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामनवमी 2024 : शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाचा जल्लोष; लाखो भाविक शिर्डीत दाखल - Ram Navami 2024 - RAM NAVAMI 2024

Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त शिर्डीच्या साई बाबा मंदिरात मंगळवारपासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झालीय. या उत्सवाचं हे 113वं वर्ष आहे. यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झालेत.

Ram Navami 2024
शिर्डीच्या साई मंदिरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा; लाखो भाविक शिर्डीत दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 12:18 PM IST

शिर्डीच्या साई मंदिरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शिर्डी Ram Navami 2024 : शिर्डीत रामनवमी उत्सवाची मंगळवारपासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झालीय. आज या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी ही शिर्डीत दिसून येतेय. साईंनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साई बाबा मंदिरावर आकर्षक विद्युत् रोशनाई तसंच आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.


उत्सवाचं 113वं वर्ष : शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलाय. भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पूजा करुन साईमूर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. साईबाबांना मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या जलानं करण्यात आलय. दरम्यान सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आज मध्यान्ह आरती अगोदर साईमंदिरासमोर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी राम जन्माचं मोठया भक्तीभावानं स्वागत केलं. शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं यंदाच हे 113वं वर्ष आहे. भाविकांमध्ये साईभेटीचा आनंद ओसंडून वाहत आहे. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईं मंदिराला आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आलीय.

प्रवेशद्वारासमोर आकर्षक देखावा : रामनवमी उत्सवानिमित्तानं मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं साईबाबा मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर प्रभू रामचंद्र, माता सिता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती असलेला 50 फुटी देखावा साकारण्यात आलाय. हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. आकर्षक विद्युत रोशनाईनं नटलेली महाद्वाराची प्रतिकृती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतेय. मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळानं स्वखर्चानं ही प्रतिकृती साकारलीय. यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीसचा उपयोग करण्यात आलाय.

साई मंदिर रात्रभर खुलं : रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक इथं येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतुर झालेला भक्तगण साई मूर्तीची केवळ एक झलक पाहाण्यासाठी असुरलेला असतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते. त्यामुळंच हा उत्सव 'याची देही, याची डोळा' अनुभवन्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. रामनवमी उत्सव 2024 : साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात - Ram Navami 2024
  2. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला देण्यात येणारे व्हीआयपी दर्शन बंद, जाणून घ्या कारण - Ram Navami 2024

ABOUT THE AUTHOR

...view details