मुंबईChhagan Bhujbal :महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष चिघळत असतानाच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 15 फेब्रुवारी विधिमंडळाचे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या अधिवेशनात मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विशेष अधिवेशन :मराठा आरक्षणासाठी विधिमंडळानं 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. कुणबींची ओबीसी प्रवर्गात घुसखोरी होत आहे, त्याऐवजी त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, अशी मागणी विधिमंडळाच्या 15-16 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळं मराठा समाजासाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात नवीन अधिसूचनेवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. कुणबीतील सगे सोयरे प्रमाणपत्र तसंच मागासवर्ग आयोगानं सादर केलेल्या अहवालावर अधिवेशनात चर्चा होईल. मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा अल्टिमेटम दिला आहे. तो अजूनही कायम आहे.