मुंबई Chhota Rajan : जया शेट्टी हत्याप्रकरणी छोटा राजनला मुंबईतील विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए एम पाटील यांनी ही शिक्षा सुनावलीय. ही त्याला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची दुसरी शिक्षा आहे. छोटा राजन हा पत्रकार जे डे हत्येप्रकरणी यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
छोटा राजन तिहार तुरुंगात : मुंबईतील हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजनला ही शिक्षा सुनावण्यात आलीय. भा. दं. वि. कलम 302,120 ब अंतर्गत त्याला जन्मठेप व पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलीय. 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात अटक करण्यात आली व त्यानंतर त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं. तेव्हापासून त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलंय.
साथीदार यापुर्वीच दोषी : गावदेवी येथील हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी यांना छोटा राजनच्या गुंडांनी खंडणीसाठी धमकावलं होतं. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं. नेमकं त्याच कालावधीत 4 मे 2001 रोजी त्यांची त्यांच्या हॉटेलमध्ये घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजन व त्याच्या गुंडांविरोधात याप्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोकाद्वारे हा खटला चालवण्यात आला. या गुन्ह्यातील छोटा राजनच्या इतर तीन साथीदारांना यापूर्वीच दोषी ठरवण्यात आलं होतं.