अमरावती :राज्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणं सुलभ व्हावं, यासाठी निवडणूक विभागाकडून अमरावती विधानसभा मतदारसंघात स्पेशल रथाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांगांना त्यांच्या घरून मतदान केंद्रावर आणि मतदान केंद्रावरून घरी जाण्याची व्यवस्था या रथाच्या माध्यमातून होईल.
मतदारांना संपर्क साधण्याचं आवाहन :अमरावती विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या दिव्यांग मतदारांनी त्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी जाण्यास त्रास होत असल्यास मतदानाच्या दिवशी 9890698712 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन मदतकक्ष प्रतिनिधी तथा ग्राम महसूल अधिकारी सुनील भगत यांनी केलं आहे. "मतदानाच्या दिवशी संपर्क साधणाऱ्या दिव्यांगांच्या मदतीसाठी हा रथ दिव्यांगांच्या दाराशी पोहोचेल. अमरावती विधानसभा मतदारसंघात नेमके किती दिव्यांग मतदार आहेत ही संख्या अद्याप उपलब्ध नाही. मात्र, आमच्याशी संपर्क साधणाऱ्यांना आम्ही निश्चित मदत करू," असं सुनील भगत यांनी सांगितलं. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.