पुणे Sandalwood Smuggling In Pune : पुण्याचा सर्वात शांत, सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात पुष्पाभाईंनी धुडगूस घातला. या हत्यारधारी टोळक्यानं घरात राहणाऱ्या नागरिकांना ठार मारण्याची धमकी देत 70 वर्ष जुनं आणि 6 फूट सिमेंटचा चौथरा केलेलं चंदनाचं झाड अवघ्या काही मिनिटात कापून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्यानं ही चोरी 10 ऑगस्ट रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास केली. एखाद्या चित्रपटात चंदनाची तस्करी केली जाते, त्याच पद्धतीनं ही चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात 41 वर्षीय महिलेनं तक्रार दिली आहे. त्यावरुन सात ते आठ चंदन तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिनेस्टाईल पळवलं चंदनाचं 70 वर्ष जुनं झाड :पुण्यातील प्रभात रोडवरील जुन्या कर्नाटक हायस्कूलसमोरील ठाकूरधाम भारती निवास कॉलनीत परळीकर यांचा बंगला आहे. या बंगल्यात 70 वर्ष जुनं चंदनाचं झाड आहे. सन 2008 साली एकदा अश्याच पद्धतीनं हे झाड तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तेव्हा शिला परळीकर यांनी चोरांना हाकलून लावलं होतं. त्यानंतर त्यांनी झाडाला मजबूत असा 6 फुटी उंच चौथरा बांधून घेतला. त्यावर 5 फुट लोखंडी ग्रील करून घेतले. पण हा चौथरा आणि ग्रील पंधरा मिनिटात तोडून या चोरांनी 70 वर्ष जुनं झाड तोडून चंदनाची तस्करी केली आहे.
हत्यारधारी टोळक्यांनी बंगल्यात घुसून नागरिकांना धमकावलं :याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा श्री ठाकूरधाम भारती निवास कॉलनीत बंगला आहे. हा परिसर कर्वे रस्ता आणि प्रभात रस्त्याच्या मधील भागात आहे. परिसरात दिवसाही वर्दळ कमी असते. तर रात्रीच्या वेळेला अपुरा प्रकाश असतो. हा भाग उच्चभ्रू, शांत आणि सुरक्षित देखील मानला जातो. 10 ऑगस्टच्या मध्यरात्री सात ते आठ जणांचं टोळकं तक्रारदार यांच्या बंगल्याच्या आवारात घुसलं. त्यांनी चंदनाचं झाड कापण्यास सुरूवात केली. तेव्हा या आवाजानं तक्रारदारांसह त्यांचं कुटुंबीय उठलं. आवाज ऐकून तक्रारदार महिला बाहेर आल्या. यावेळी टोळकं त्यांना दिसलं. महिलेला पाहून टोळक्यानं त्यांना हत्याराचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शांत बसण्यास सांगितलं. झाड कापून झाल्यावर टोळकं तिथून पसार झालं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.