मुंबई Shrikant Shinde should get cabinet :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापना होत आहे. या सरकारमध्ये 'एनडीए'मधील घटक पक्षांनाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाला 18 मंत्री पद, तसंच घटक पक्षांना 18 मंत्रीपदं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्रातील भाजपाच्या दिग्गज नेत्यांसह शिवसेना खासदारांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला देखील केंद्रात मंत्रीपदे मिळणार आहेत.
भाजपातील 'या' मंत्र्यांची लागणार वर्णी : भारतीय जनता पक्षातील राज्यातील वरिष्ठ नेते नितीन गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल या विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय रक्षा खडसे आणि राज्यातील एखाद्या नेत्याची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदेंच्या नावाचा आग्रह :शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा आग्रह करण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. मात्र, त्यांची एवढीचं ओळख नसून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. तसंच त्यांनी केलेल्या विकास कामांमुळं त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केलीय. शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय शिवसेनेचे प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांची नावंसुद्धा मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.