शिर्डी (अहमदनगर) Shirdi Saibaba Dahihandi :साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. साई समाधी मंदिरासमोरील स्टेजवर पुणे येथील ह.भ.प प्रज्ञा देशपांडे महाराज यांचं किर्तन ठेवण्यात आलं होतं. किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी पाळणा हलवत श्रीकृष्ण जन्माचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईबाबा मंदिरात दहीहंडी उत्सव : साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर पुणे येथील ह.भ.प. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर यांचं गोपाळ काला किर्तन पार पडल. काल्याच्या किर्तनासाठी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते. किर्तनानंतर दुपारी बारा वाजता साईबाबांच्या समाधी मंदिरात साई संस्थानच्या वतीनं फुलांनी सजवून बांधण्यात आलेली दहीहंडी फोडली. साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज कुटुंबातील सदस्य सर्जेराव कोते यांच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आली.
साई भक्तांची गर्दी :यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, साई संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.