ग्रामपंचायत कार्यालयावर काढला हंडा मोर्चा ठाणे Water Issue In Thane :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ठाणे जिल्ह्यातच पतंप्रधान मोदींच्या 'हर घर जल' (Har Ghar Jal) योजनाचा फज्जा उडाल्याचं पाहावयास मिळालं. जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकीकडं जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. पाण्याची तीव्र टंचाई ८५ गाव पाड्यात असून २३ टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईमुळं महिलांच्याच्या डोक्यावरील हंडा कंबरेवर येत नसल्याचं पाहून श्रमजीवी संघटनेनं (Shramjivi Sangathan) आक्रमक पवित्रा घेत, बहुतांश टंचाईग्रस्त ग्रामपंचायत कार्यालयावर १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत रिकामे हंडे मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुबलक पाणी कधी येणार: यावेळी घरात, झोपडीत नळाचे स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी येणार याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यामुळं मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यातच मोदींच्या 'हर घर जल' योजनेच्या खडखडाटमुळं श्रमजीवी संघटनेनं लोकसभा निवडणुकीतच रान उठवत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं आहे.
ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा : पाणी टंचाईसह मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी गेले अनेक दिवस गावागावात जाऊन जनजागृती करण्याचं काम श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करत होते. यानंतर १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संघटनेनं पाण्याच्या प्रश्नावर एक चळवळ सुरू केली आहे. या हंडा मोर्चाचं नेतृत्व त्या-त्या भागातील श्रमजीवी संघटनेचे गाव विभाग स्तरावरील गाव कमिटी तसंच झोन कमिटीच्या प्रमुखांनी केलं आहे. तर पदाधिकाऱ्यांनी मोर्चांना भेटी देऊन लढवय्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. या मोर्चामुळं पाणी पुरवठा प्रशासन पार हादरून गेलं आहे. यापुढं अंदाजपत्रकाप्रमाणं आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणं काम होतं की, नाही यावर श्रमजीवीचे प्रशिक्षित कार्यकर्ते तसंच नागरिकांचं लक्ष असणार यात मात्र शंका नाही.
काय आहे मोदींची योजना : ४ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत नळानं पाणी पुरवठा मिळालीच पाहिजे अशी मोदींची योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं कोट्यवधी रुपयाची तरतूद केलीय. १५ व्या वित्त आयोग आणि पेसामधून ही पाणी पुरवठ्यासाठी खर्च होणार आहे. प्रत्येक गावात २ कोटी रुपयांपासून १० कोटी पर्यंतचा निधी आलेला आहे. मात्र, या योजना आजपर्यंत पूर्णत्वास नाहीत.
अशी आहे तालुक्याची ओळख: शहापूर धरणाचा तालुका आणि पावसाचे माहेरघर आणि प्रचंड पर्जन्याचा तालुका अशी शहापूर तालुक्याची ओळख आहे. भातसा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, या धरणात पाणी साठ्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी सुरुवातीला तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळं हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, पावसाळा सरते शेवटी पावसानं दगा दिल्यानं ही धरणे काही प्रमाणात रिकामी राहिली. स्थानिक शेतकरी आणि भूमीपुत्र, धरण प्रकल्पग्रस्त यांना प्रथम पाणी पुरवण्याचं सोडून मुंबई, ठाण्याला पाणी जात असल्यानं स्थानिकांवर अन्याय होत आहे.
पाण्यासाठी करावी लागते कसरत: तालुक्यातील गावागावांत दरवर्षी पाचवीला पुजलेली पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ यावर्षी बसू लागलीय. काही गावांत विहिरीचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव धुळखात पडला आहे. शहापूर तालुक्यातील कसारा जवळील वरसवाडी, आघणवाडी, चिंद्याची वाडी, तेलंमपाडा या गावाना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या असून गावांत असलेल्या विहिरींनी तळ गाठलाय. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठं दिव्य पार करावं लागत आहे. गावातील महिला, वृद्ध, लहान मुली काही किलोमीटर दरी खोऱ्यातून पायी प्रवास करीत पहाटेपासून डबक्याच्या ठिकाणी पाण्यासाठी रांगा लावतात. एक हंडा भरण्यासाठी अर्धा तास लागत असल्यानं महिला भगिनींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
३३ टँकरने पाणी पुरवठा सुरू : तालुक्यात ११० ग्रामपंचायतींमध्ये ३ लाख ३४ हजार लोकसंख्या असून यापैकी १० गाव आणि ७५ पाडे मिळून ८५ गावपाडयांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गाव पाड्याना टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून ३३ टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ही टँकरची संख्या अपुरी पडली आहे. यंदाच्या वर्षालाही १४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करून यामध्ये पाणी पुरवठा करणारे टँकर, विंधन विहीर करणे, नळ पाणी योजना दुरुस्ती, बोरवेल मारणे आदी पाणी पुरवठा संबधी कामांचा समावेश आहे. मात्र, गेल्या २००८ पासून आज तागायत एकट्या शहापूर तालुक्यातील २०० हुन अधिक पाणी योजना रखडल्यानं, तालुक्यातील गावागावांत दरवर्षी पाचवीला पुजलेली पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ दरवर्षी बसत आहे.
हेही वाचा -
- भाजपावर मित्रपक्ष संपवण्याचा आरोप, लोकसभा निवडणुकीत बसणार महायुतीला फटका? - Lok Sabha Elections 2024
- नारायण राणेंची पत्रकार परिषद! रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याचे दिले संकेत; उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका - Narayan Rane Press Conference
- लोकसभेची रणधुमाळी! अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून 190 मुक्तचिन्हं घोषित; वाचा चिन्हांची नावं - Election Commission gave symbols