मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक भागात उद्योगपती गौतम अदानी यांचे विविध प्रकल्प सुरू आहेत. आता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्ट प्रशासनाकडून अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. मात्र, या स्मार्ट मीटरमुळं ग्राहकांचं मोठं नुकसान होणार असल्याचा दावा शिवसेनेनं (उबाठा) केला.
जी वीज वापरली जाणार नाही, ती वापरल्याचं दाखवून ग्राहकांना लुटण्याचा प्रकार केला जाणार असल्याचा आरोप शिवसेनेकडून (उबाठा) केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या स्मार्ट मीटर विरोधात गुरुवारी (12 डिसेंबर) शिवसेनेच्या (उबाठा) शिष्ट मंडळानं बेस्ट प्रशासनाची भेट घेत निवेदन दिलं. तसंच "जोपर्यंत आमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याचं थांबवण्यात यावं", अशी मागणी करण्यात आल्याचं शिवसेनेचे (उबाठा) आमदार अनिल परब यांनी सांगितलं.
ग्राहकांची लूट : बेस्ट प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "पूर्वी जे मीटर होते, त्यामध्ये तुम्ही जेवढी वीज वापरली तेवढंच वीजबिल यायचं. परंतु, आता अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरमध्ये एक विशिष्ट चिप बसवण्यात आलंय. ती चिप कंपनीचे कर्मचारी कार्यालयात बसून ऑपरेट करणार आहेत. त्याच्यात ते फेरफार करून जी वीज वापरली नाही, त्याचेही अव्वाच्या सव्वा वीजबिल लावले जावू शकते. परिणामी स्मार्ट मीटरमुळं ग्राहकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा ग्राहकांना लुटण्याचा प्रकार आहे. त्यामुळं अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम तत्काळ थांबवण्यात यावं, अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे", असं परब यांनी सांगितलं.
त्वरित वीज कनेक्शन कट : "पूर्वीच्या मीटरमुळं बिल भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही वीजबिल भरता येत होतं. परंतु, स्मार्ट मीटरमुळं मुदत संपते त्याच दिवशी वीजबिल भरलं नाही, तर त्याच दिवशी चिपच्या माध्यमातून कार्यालयात बसून अदानी कंपनीचे कर्मचारी तुमचं वीज कनेक्शन कट करू शकतात. शेवटी मुंबईतील हा कष्टकरी आणि नोकरदार वर्ग आहे. पगार वेळेवर झाला नाहीतर बिल भरायला उशीर होतो. पण आता स्मार्ट मीटरमुळं थेट वीज कनेक्शन कापलं जाणार असून हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळंच आम्ही बेस्ट प्रशासनाला निवेदनाद्वारे काही प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची जोपर्यंत समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत हे स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये. असा आम्ही निवेदनाद्वारे सूचना वजाइशारा दिलाय. मात्र, तरी जर मीटर बसवण्यात आलं, तर आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलन छेडण्यात येईल", असा इशारा यावेळी अनिल परब यांनी दिला.
300 युनिट वीज माफ करावी : पुढं ते म्हणाले, "महाराष्ट्र सरकारनं जसे शेतकऱ्यांसाठी कृषी वीजबिल माफ केले. तसंच कष्टकऱ्यांसाठी 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी. लावण्यात आलेले स्मार्ट मीटर काढण्यात यावेत. महत्त्वाचं म्हणजे पूर्वीचे कॅश काऊंटर सध्या बंद आहेत. ते पुन्हा पुर्ववत सुरू करावेत. तिथं 50 हजारपर्यंत कॅश स्विकारण्यात यावी. स्मार्ट मीटरबाबत सार्वजनिक सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे बेस्ट प्रशासनाला केली आहे", अशी माहिती अनिल परब यांनी दिली. याबाबत अदानी कंपनीकडून स्मार्टमीटरबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
हेही वाचा -
- विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात नागपुरात तीव्र आंदोलन, ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न - Prepaid Meter Issue