अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तलवार यात फरक आहे. खरंतर ज्यांना तलवार म्हटलं जातं तिचं खरं नाव 'धोप' असं आहे. शिवकालीन अनेक तलवारी, धोप यासोबतच त्या काळातील विविध शस्त्रांची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यात स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्याकडं असणाऱ्या शस्त्रांचा संग्रह प्रदर्शनाच्या माध्यमातून खुला केला. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात असणारे सर्व शिवकालीन शस्त्र हे विदर्भाच्या विविध भागातूनच मिळवण्यात आलेत. विदर्भातील या शिवकालीन शस्त्रसाठा संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट..
स्वराज्य सेवा प्रतिष्ठानने 'असा' केला शस्त्रांचा संग्रह : गड किल्ल्यांचं संवर्धन करणं हा स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. 2015 मध्ये स्वराज्य सेवा प्रतिष्ठानची चांदुर बाजार शहरात स्थापना झाली. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असतानाच विदर्भाच्या विविध भागात शिवकालीन शस्त्र अनेकांकडं असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांना मिळाली. यानंतर अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातून काही व्यक्तींच्या घरून जी काही शस्त्र मिळाली त्या सर्व शस्त्रांचा साठा स्वराज्य सेवा प्रतिष्ठानकडे संग्रहित आहे. विविध शाळा, महाविद्यालयं आणि कार्यक्रम-उत्सव दरम्यान या शस्त्रसाठ्यांचं प्रदर्शन आयोजित केलं जातं.
अशी आहेत शस्त्रं : दोन प्रकारच्या धोप, विविध प्रकारच्या तलवारी, पट्टा, दांडपट्टा, ढाल, बिन्नोड, बिचवा, कट्यार,, फरशा, गोफण, बाण, तोफ गोळे अशी शस्त्र स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या संग्रही आहेत. या प्रत्येक शस्त्रांचं वैशिष्ट्य स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे विशद करतात.
शस्त्रांचं 'असं' आहे वैशिष्ट्य : मराठा धोप : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शस्त्रसज्ज छायाचित्रांमध्ये त्यांच्या उजव्या पायापासून कमरेच्यावरपर्यंत जी तलवार लटकलेली दिसते तिला धोप असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांची धोप ही सरळ लोखंडी पात्याची असून छत्रपती संभाजी महाराजांकडं असणारी धोप मात्र सरळ नसून थोडीशी वक्र आहे.
पट्टा आणि दांडपट्टा : युद्धात वापरलं जाणारं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे पट्टा. या पट्ट्याला तलवारी सारखंच पातं असतं. दांडपट्ट्याचं पातं हे पट्ट्यापेक्षा लवचिक असतं. दांडपट्ट्याला असणाऱ्या मुठीला ढोबळ असं म्हणतात. या ढोबळमध्ये हाताच्या ढोपरापर्यंतचा भाग जातो. दांडपट्टा चालवण्यासाठी शक्ती आणि बुद्धीचा वापर करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी कांचनबारीचं युद्ध हे दोन्ही हातात दांडपट्टा घालून लढलं असा उल्लेख बखरींमध्ये सापडतो असं शिवा काळे यांनी सांगितलं.
बिन्नोड : बिन्नोड हे अतिशय दुर्मिळ असं शस्त्र आहे. बिनोडमध्ये एकेरी आणि दुहेरी असे दोन्ही प्रकार असतात. बिन्नोडच्या टोकावर लोखंडी साखळीनं बांधलेला गट्टू असतो. हा गट्टू शिसा या धातूनं बनवलामुळं तो भारी भरकाम असतो. बिन्नोडचा वार शत्रूच्या डोक्यावर केला तर, शत्रू जागेवरून उठतच नाही इतकं हे घातक शस्त्र होतं.
छुपे शस्त्र :चिलामन, बिछवा कटार आणि कुकरी ही खरंतर छुपी शस्त्र म्हणून ओळखली जातात. लहान मुलं आणि स्त्रियांजवळ ही शस्त्र स्वरक्षणासाठी पूर्वी असायची.
तलवारीची मूठ : स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या शस्त्र संग्रहामध्ये जाफराबादी, मोगली, मराठा आणि राजपूत तलवारी आहेत. या तलवारींचं वैशिष्ट्य म्हणजे या तलवारीला असणारी मुठ ही तलवार नेमकी कोणाची हे स्पष्ट करते. तलवारीच्या मुठीचं वैशिष्ट्य म्हणजे या मुठीच्या अगदी खालच्या टोकाला तोटी असं म्हटलं जातं. तोटीच्या थोडं वर गांजा आणि दस्तानी म्हणतात. ज्या ठिकाणी तोटी आणि मुठ एकत्र येतं त्या ठिकाणाला फुल आणि फुलाच्या अगदी किंचित वरचा भाग हा कटोरी म्हणून ओळखला जातो.
तलवारीच्या ज्या ठिकाणी मूठ आवळली जाते त्या भागाला मुसुमा किंवा मुस्कळ म्हणतात. त्याच्या अगदी वर जिथं पंजा असतो त्याच्या वरच्या भागाला परज म्हणतात. तलवार घट्ट पकडल्यावर मुठीच्या आतल्या बाजूनं वरच्या भागाला गादी म्हणतात. तर बाहेरच्या बाजूला ठोला असं म्हणतात. फुलाच्याविरुद्ध दिशेला कडी असते. यानंतर तलवारीच्या पात्याच्या दिशेनं मुठीचा मजबूत भाग हा खजाना नावानं ओळखला जातो. त्यानंतर तलवारीचं पातं जिथे सुरू होतं त्याला नखा म्हटल्या जातं आणि नखाच्या वरचा भाग हा नेत्र म्हणून ओळखला जातो.