मुंबई :Shiv Sena party fund : शिवसेनेच्या पक्ष निधीवरुन पुन्हा एकदा राजकरण तापलं आहे. शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. या चौकशीदरम्यान शिवसेना पक्षाचे निधी खातं कोण चालवतं? ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले? याची माहितीही मागवण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडून (फेब्रुवारी 2023)मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं घोषीत केलं होतं. त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आलं होतं. त्यामुळे पक्षनिधीतून काढण्यात आलेल्या निधीवरून हे प्रकरण आणखी तापणार असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं प्राथमिक तपासाची चक्रे फिरवली आहेत.
काय आहे तक्रार?-शिवसेनेनं (शिंदे गट) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) संपर्क साधला असून प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचा हवाला देत लेखी तक्रार दाखल केली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानंतरही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला बगल देत उद्धव ठाकरे गटानं अधिकृत असलेल्या शिवसेनेच्या बँक खात्याचे टीडीएस आणि आयकर रिटर्न भरल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं अधिक माहिती देताना सांगितलं की," उद्धव ठाकरे गटानं आर्थिक व्यवहारात ढवळाढवळ केल्याचं शिंदे गटाचं म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर पॅन आणि टॅन तपशीलांचा गैरवापर आणि टीडीएस आणि आयकर रिटर्न भरून फसवणूक केल्याचा आरोप केला.
आर्थिक गुन्हे विभाग काय तपासणार?निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे उल्लंघन करून शिवसेनेच्या माजी नेत्यांनी पक्षाचे नेते म्हणून खोटी ओळख दिली, असा आरोप शिंदे गटानं केला आहे. हे नेते जाणूनबुजून करचोरी, बनावटगिरी आणि फसवणुकीच्या कृत्यांमध्ये गुंतले असल्याचा दावा त्यांनी पुरावा म्हणून वेब पोर्टलवरून स्क्रीन ग्रॅब सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे. पक्षाच्या खात्यांमधून पैसे काढल्याबद्दल माहिती मागवली आहे. बँक अधिकाऱ्यांकडून बँकेत झालेल्या व्यवहारांचा तपशील मागितला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) कर पेमेंट्सच्या तपशीलासाठी आयकर विभागाला पत्र आर्थिक गुन्हे शाखेनं लिहिले आहे.